Anand Paranjape Resigns | राष्ट्रवादीला धक्का! ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा; शिवसेनेत प्रवेशाची शक्यता
Anand Paranjape Resigns | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) सध्या मोठी उलथापालथ सुरू असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षात अंतर्गत उलथापालथ सुरू असल्याचे चित्र असताना नुकतेच सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती आणि आता आणखी एका मोठ्या नेत्याने राजीनामा दिला आहे.
आनंद परांजपे यांचा राजीनामा आणि नाराजीचे कारण
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मुख्य प्रवक्ते तसेच ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यांचे समन्वयक असणाऱ्या आनंद परांजपे (Anand Paranjape) यांनी आपल्या सर्व जबाबदाऱ्यांसह प्राथमिक सदस्यत्वाचाही त्याग केला आहे. त्यांनी आपला चार ओळींचा राजीनामा थेट पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या पत्रामध्ये त्यांनी आतापर्यंत पक्षाने आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबाबत आणि दिलेल्या विविध जबाबदाऱ्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली असून हा राजीनामा तत्काळ मंजूर करण्याची विनंती केली आहे. तटकरेंच्या भेटीनंतर परांजपे यांच्या या निर्णयामुळे पक्षाला मोठा हादरा बसला आहे.
गेल्या काही काळापासून परांजपे हे पक्षात नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. अलीकडेच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत पक्षात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. यामध्ये पक्षाने झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना संधी देत आमदारकी दिली. याआधीच्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्येही परांजपे यांना डावलण्यात आले होते. याच सातत्यपूर्ण उपेक्षेमुळे अखेर कंटाळून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
एकनाथ शिंदेंच्या भेटीमुळे शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण
राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर आता आनंद परांजपे नेमकी कोणती राजकीय वाट चोखाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांनी मागील काही दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची दोनदा भेट घेतली आहे. या घडामोडींमुळे ते लवकरच हाती धनुष्यबाण घेऊन शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश करतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. या वृत्ताला अद्याप त्यांच्याकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नसला, तरी त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
मनात अनेक भावना दाटून आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील माझा 14 वर्षाचा प्रवास, सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास कायम स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करीत आहे..!… pic.twitter.com/b23ltOnSCM
— Anand Paranjpe (@paranjpe_anand) May 14, 2026
विशेष म्हणजे, राज्यामध्ये जेव्हा शिवसेना पक्ष एकसंध होता, तेव्हाच परांजपे यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांची पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत वापसी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी अधिकृतपणे आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली नसली तरी, ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी दिलेल्या या राजीनाम्यामुळे ठाणे आणि पालघर पट्ट्यात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला खूप मोठी आणि न भरून येणारी हानी पोहोचली असल्याचे मानले जात आहे.
News Title: Anand Paranjape Resigns From NCP Might Join Shivsena
