'डायल 112' च्या मदतीला पोहोचण्यास उशीर:हिंगोलीत पोलिस अंमलदार निलंबित, पोलिस अधीक्षकांची मोठी कारवाई

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-14t190835446_1778765967.jpg




नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि तातडीच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘डायल 112’ सुविधेबाबत हिंगोली पोलीस दलाने अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. मदतीसाठी कॉल आल्यानंतर घटनास्थळी वेळेत न पोहोचल्यामुळे कळमनुरी पोलीस ठाण्यातील एका अंमलदाराला तात्काळ निलंबित केले आहे. त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक डॉक्टर निलाभ रोहन यांनी गुरुवारी ता. 14 काढले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील तेरा पोलीस ठाण्यांतर्गत प्रत्येक गावांमधून मदतीसाठी डायल 112 या क्रमांकावर कॉल आल्यास पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी पोहोचणे अपेक्षित आहे त्यासाठी सर्व पोलीस ठाण्यांमधून डायल 112 हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, 12 मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कळमनुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका पीडित व्यक्तीने ‘डायल 112’ वर मदतीसाठी कॉल केला होता. या कॉलला प्रतिसाद देऊन डायल 112 वर नियुक्त पोलीस कर्मचारी मर्यादित वेळेत घटनास्थळी पोहोचणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळी कर्तव्यावर असलेले पोलीस जमादार किशोर राठोड यांनी तब्बल दीड तास उशीर केला. सदर बाब पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांच्या निदर्शनास येताच त्यांनी जमादार राठोड याच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांच्या निलंबनाचे आदेश गुरुवारी ता. 14 काढण्यात आले. पोलिस अधिक्षक डॉ. नीलाभ रोहन हे कर्तव्यकठोर आणि कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. नागरिकांना पोलिसांची मदत जलद आणि विनाविलंब मिळावी यासाठी त्यांचे ‘डायल 112’ वर बारकाईने नियंत्रण असते. पोलीस दलातील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्याने नागरिकांना उत्तम सेवा द्यावी, अशा सूचना त्यांनी आधीच दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही जमादार राठोड यांनी कर्तव्यात कसूर केली त्यामुळे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे पोलीस दलात कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून, “कामात हलगर्जीपणा केल्यास गय केली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश पोलीस अधीक्षकांनी यातून दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed