मोठ्या भावाने छोट्या भावाच्या डोक्यात दगड घालून खून केला
नांदेड़ (प्रतिनिधी)- जय भीम नगर परिसरात भावानेच छोट्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत प्रकाश उत्तम खाडे (वय २०) याचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ तारखेच्या मध्यरात्रीनंतर साधारणपणे रात्री एकच्या सुमारास हा प्रकार घडला. प्रकाश हा एका दुकानात असताना त्याच्या मोठ्या भावाने त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून दोन्ही भावांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला होता, याबाबत माहिती मिळालेली नाही. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी संबंधित भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Post Views: 83
