‘डिजिटल’ कट्टरवाद:पाकचा डाॅन शहजादशी संपर्क; एटीएसचे संभाजीनगरसह राज्यात 40 ठिकाणी छापे, सोशल मीडियावरून तरुणांचे ब्रेनवाॅश

0
orig_new-project-61614313501-11626157796_1778721045.jpg




पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि ‘आयएसआय’चा हस्तक शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ४० ठिकाणी मोठी छापेमारी केली. भट्टीच्या सिंडिकेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्यभरातून ५३ तरुणांना ताब्यात घेतले. यापैकी ३२ जणांना चौकशीनंतर सोडून दिले. आक्षेपार्ह डिजिटल पुरावे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्याने उर्वरित २१ जणांवर अटकेची कारवाई सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचे कौतुक करत संबंधितांवर ‘युएपीए’ अंतर्गत कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. ताब्यात घेतलेल्यांमध्ये मराठवाड्यातील १९ (छत्रपती संभाजीनगर १३, बीड २, नांदेड २, जालना १, लातूर १), एमएमआर क्षेत्रातील १५ (मुंबई, मीरा रोड, नालासोपारा), विदर्भातील १० (नागपूर, भंडारा, चंद्रपूर, अकोल्यातून ताब्यात घेतलेला संशयित वाशिमचा रहिवासी), पुण्यातील ८, तर नाशिक आणि जळगावसह उत्तर महाराष्ट्रातील ७ जणांचा समावेश आहे. मुंबई भागातील ७ जण ‘हाय-प्रोफाईल’ संशयित असून, त्यांच्याकडून मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियाद्वारे प्रसिद्धीचा हव्यास असलेले तरुण रडारवर, दहशतवादी हल्ल्याचा कट सोशल मीडियातून कमी वेळात प्रसिद्धी मिळवू पाहणाऱ्या तरुणांना भट्टी गँगने जाणीवपूर्वक लक्ष्य केले आहे. काही तरुणांना परराज्यातून सिंडिकेटशी संबंधित संशयितांचे फोन आले होते. ‘आयएसआय’ने भट्टीच्या नेटवर्कचा वापर करून भारतात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याची योजना आखली होती. कट्टरपंथी विचारसरणी पेरून तरुणांचे ब्रेनवॉशिंग करणे आणि त्यांना देशविरोधी कारवायांसाठी प्रवृत्त करणे, असा या टोळीचा मुख्य अजेंडा होता. ‘डिजिटल’ ब्रेनवॉशिंगचा ‘सोशल मीडिया ट्रॅप’ बेरोजगार तरुणांना पैसे आणि सत्तेचे आमिष दाखवून व्हर्च्युअल जगातून थेट ग्रामीण व निमशहरी भागातील तरुणांशी संपर्क साधला जातो. तरुणांच्या डिजिटल फूटप्रिंट्सवरून त्यांना ट्रॅक करणे आणि या ऑनलाइन धार्मिक कट्टरवादाला (ब्रेनवॉशिंग) आळा घालणे आणि कट-कारस्थान उघडकीस आणणे हे तपास यंत्रणांसमोरील सर्वांत मोठे आव्हान बनले आहे. दिल्लीतील ‘गँग बस्ट २.०’ चे महाराष्ट्र कनेक्शन या कारवाईचे धागेदोरे दिल्ली पोलिसांच्या ‘गँग बस्ट २.०’ मोहिमेत दडलेले आहेत. दिल्लीतील मंदिर, लष्करी तळ व महामार्गावरील प्रसिद्ध ढाबे लक्ष्य करण्याचा कट नुकताच उघड झाला होता. दिल्लीत अटक झालेल्या भट्टीच्या ९ साथीदारांच्या चौकशीतूनच महाराष्ट्रातील हे कनेक्शन समोर आले. त्यांच्यावरच उत्तरेतील सुरक्षा जवानांच्या ‘टार्गेट किलिंग’ची जबाबदारी होती. शहजादचे बिश्नोई गँगशी वैर, बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांना मदत मूळचा लाहोरचा रहिवासी असलेला शहजाद भट्टी सध्या दुबईतून गुन्हेगारी नेटवर्क चालवतो. शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांच्या तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या भट्टीवर भारतात डझनहून अधिक गुन्हे दाखल आहेत. २०२४ मधील बाबा सिद्दीकी हत्येतील सूत्रधारांना त्यानेच पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप आहे. एकेकाळी लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार असलेला भट्टी आता त्याचा कट्टर शत्रू असून, २०२६ च्या सुरुवातीला पोर्तुगालमध्ये बिश्नोई गँगने भट्टीवर जीवघेणा हल्लाही केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed