![]()
टाकरखेडा संभू परिसरातील मुख्य मार्गावर एक वीज खांब धोकादायकरीत्या वाकलेला आहे. यामुळे वारंवार अपघात घडत असून, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना तो धडकत असल्याने नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या स्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. या खांबावर सुमारे १५० घरगुती वीज जोडण्या आहेत. वाहनांच्या धडकेमुळे अनेकदा या जोडण्यांच्या वीज तारा तुटतात. परिणामी, एक ते दोन तास वीजपुरवठा खंडित होतो. याचा मोठा फटका विद्यार्थी, व्यावसायिक, दुकानदार तसेच सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. या गंभीर समस्येबाबत काही नागरिकांनी महावितरणकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन हा धोकादायक वीज खांब सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून जोर धरत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी महावितरणने त्वरित उपाययोजना करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
टाकरखेड्यात वाकलेला वीज खांब:वारंवार अपघात, नागरिकांच्या जीविताला धोका
