पटेल, तटकरेंसह 22 आमदार भाजपतून लढणार:रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ; तटकरेंना 'सिल्व्हर ओक'चा चहा आवडत असल्याचाही टोला
![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे तब्बल 22 आमदार भाजपतून लढणार असल्याचा दावा विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली असून, या आमदारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एनसीपीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची कथितपणे हकालपट्टी केल्यानंतर तटकरेंनी ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त दावा केला आहे. तसेच सुनेत्रा पवारांनी या प्रकरणी दिलेल्या स्पष्टीकरणावरही निशाणा साधला आहे. सुनेत्रा पवारांची कारवाई योग्यच होती, पण… रोहित पवार आज सकाळी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सुनेत्रा पवारांनी केलेली कारवाई स्वगात करण्यासारखीच होती. तो एक धाडसी निर्णय होता. धाडसी निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. पण धाडसी निर्णय घेतल्यानंतर लगेचच त्याला आपण वेगळे ट्विट करून हो, नाही करणे करणे हा त्या पक्षाचा विषय असला तरी अवघड आहे. हा निर्णय अजित पवारांनी घेतला असता तर त्यांनी तो बदलला नसता. समजा आम्ही त्या ठिकाणी असलो असतो, माझ्यासारखा एखादा कार्यकर्ता असता तर आम्हीही आपला निर्णय बदलला नसता. त्यामुळे निर्णय बदलण्यातून त्या पक्षात अनेक नेते असल्याचा संदेश जातो. यासह पद काय दिले काय दिले नाही हे वैयक्तिक पातळीवर संबंधितांना काय वाटते हा त्यांचा मुद्दा आहे. तो त्यांना लखलाभ. पटेल, तटकरेंसह 22 जण भाजपतून लढणार रोहित पवार यांनी यावेळी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे तब्बल 22 आमदार भाजपमधून लढणार असल्याचाही दावा केला. ते म्हणाले, सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल हे 22 आमदार घेऊन भाजपमधून लढणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या पक्षाचेही काही आमदार भाजपच्या गळाला लागलेत. मावळचे आमदार (सुनील शेळके) हे सुद्धा भाजपमधूनच लढणार आहेत. पत्रकारांनी यावेळी त्यांनी सुनील तटकरे व शरद पवारांच्या भेटीविषयी प्रश्न केला असता त्यांनी त्यावर अत्यंत मिश्किल टिप्पणी केली. सुनील तटकरेंना कदाचित सिल्व्हर ओकचा चहा आवडत असेल, असे ते म्हणाले.
