NEET पेपरफुटीचे लातूर कनेक्शन?:42 प्रश्न जुळल्याच्या दाव्यानंतर क्लासेसचे संचालक चौकशीच्या फेऱ्यात; तक्रारीनंतर पोलिसांचा तपास वेगात
![]()
देशभरात गाजत असलेल्या NEET (UG) 2026 पेपरफुटी प्रकरणात आता लातूरचे नाव पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकनंतर आता लातूरमधील एका खासगी क्लासेसची चौकशी सुरू करण्यात आली असून, एका विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीमुळे या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. मॉक टेस्टमध्ये विचारलेले 42 प्रश्न प्रत्यक्ष NEET परीक्षेत जशाच्या तसे आल्याचा गंभीर दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित क्लासेसचा पेपरफुटीशी काही संबंध आहे का, याचा तपास आता पोलिसांनी सुरू केला आहे. या घडामोडींमुळे राज्यभरात मोठी चर्चा रंगली असून विद्यार्थ्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. 12 मे रोजी संबंधित विद्यार्थिनीच्या पालकांनी थेट लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन लेखी तक्रार दिली. त्यांनी तक्रारीत म्हटले की, परीक्षेपूर्वी खासगी क्लासेसकडून घेण्यात आलेल्या मॉक टेस्टमध्ये विचारलेले 42 प्रश्न प्रत्यक्ष NEET प्रश्नपत्रिकेत तंतोतंत दिसून आले. या प्रकारामुळे पालकांनी संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या असून संबंधित क्लासेसची कागदपत्रे, प्रश्नसंच आणि परीक्षा प्रक्रियेची माहिती तपासली जात आहे. या प्रकरणाचा संबंध मोठ्या पेपरफुटी रॅकेटशी आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लातूरचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी समरजीत साळवे यांना सविस्तर चौकशीचे आदेश दिले आहेत. प्राथमिक तपासात संशयास्पद बाबी आढळल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित हा अत्यंत संवेदनशील विषय असल्याने चौकशी अत्यंत काळजीपूर्वक केली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, या प्रकरणाचे नाशिक कनेक्शन आधीच समोर आले आहे. नाशिकमधील शुभम खैरनार या 30 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याने कथितरित्या 15 लाख रुपयांना प्रश्नपत्रिका विकल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयकडे देण्यात आला आहे. पुढील चौकशीसाठी शुभम खैरनारला दिल्लीला नेले जाणार असल्याची माहितीही समोर आली आहे. नाशिकमधून पेपर बाहेर पडल्यानंतर तो हरियाणा आणि इतर राज्यांपर्यंत पोहोचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. परीक्षा रद्द झाल्याने नियोजनाबाबत गोंधळ 3 मे 2026 रोजी देशभरात NEET परीक्षा घेण्यात आली होती. सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. महाराष्ट्रातून जवळपास अडीच लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मात्र परीक्षा होण्याच्या 42 तास आधी प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा आरोप समोर आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएकडून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे लाखो विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला आहे. अनेक विद्यार्थी परीक्षा झाल्यानंतर आपल्या गावी परतले होते, तर काही जण सुट्टीसाठी बाहेर गेले होते. अचानक परीक्षा रद्द झाल्याने पुढील नियोजनाबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.
