आरोपी डाॅ. खैरनारचे मुंडण-वेशांतर, तरीही पकडले:अचूकपणे मोबाइल लोकेशन ट्रेस करून, इतर तांत्रिक पुराव्यांमुळे आरोपीला हेरण्यात यश
![]()
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी देशभरात एकाच वेळी झालेल्या ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता थेट नाशिकपर्यंत पोहोचले आहेत. देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून नाशिक पोलिसांनी इंदिरानगर परिसरातून संश
.
सीबीआय आणि राजस्थान पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स, सीकरच्या पथकाने या संशयिताचा फोटो आणि मोबाईल नंबर नाशिक पोलिसांना पाठवला होता. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि गोपनीय पद्धतीने तांत्रिक तपासाची चक्रे फिरवली. मोबाइल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांआधारे पोलिसांनी लोकेशन अचूकपणे ट्रेस केले.
भोपाळमधून वैद्यकीय शिक्षण आणि नाशिकमध्ये प्रॅक्टिस
डॉ. शुभम खैरनार याने भोपाळच्या सत्य साई हॉस्पिटलमधून बीएएमएसची पदवी यशस्वीपणे प्राप्त केली आहे. शेवटच्या चौथ्या वर्षात तो काही विषयांत नापास झाल्याने पुन्हा त्याने परीक्षा दिली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो नाशिकमध्ये आला आणि आपल्या एका जवळच्या नातेवाइकाच्या वडाळा नाका भागातील हॉस्पिटलमध्ये तो ट्रेनी डॉक्टर म्हणून गेल्या सहा महिन्यांपासून प्रॅक्टिस करत होता. वैद्यकीय क्षेत्रातील ज्ञान असल्याने त्याने नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि काउन्सेलिंग सुरू केले होते. याच मार्गदर्शनाच्या नावाखाली तो पेपरफुटीच्या रॅकेटमधील दलालांच्या संपर्कात आला असण्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सीबीआयच्या तपासात आणखी नावे समोर येऊ शकतात.
६ तासांच्या चौकशीनंतर आरोपीचा सीबीआयकडे दिला ताबा
इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक परिसरातील तो नेहमीप्रमाणे देवदर्शनासाठी पायी जात असताना पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. पोलिसांना चकवा देण्यासाठी त्याने स्वतःची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्याने मुंडण केले होते. वेशांतरामुळे सुरुवातीला त्याची ओळख पटवणे पोलिसांनाही कठीण गेले. मात्र तांत्रिक पुराव्यांआधारे तोच संशयित असल्याची खात्री होताच साध्या वेशातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईनंतर पाथर्डी फाटा परिसरातील गुन्हे शाखा युनिट दोनच्या कार्यालयात नेण्यात आले. दिवसभर बंदोबस्तात ताब्यात ठेवून त्याची कसून प्राथमिक चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर सायं. ६ वाजेच्या सुमारास सीबीआयचे विशेष पथक नाशिकमध्ये दाखल झाले. कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून सखोल तपासासाठी या संशयिताचा ताबा सीबीआयच्या पथकाकडे दिला आहे.
मूळचा नांदगावचा रहिवासी, नाशकात भाड्याने राहायचा, याचे वडीलही डॉक्टर
संशयित हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील नांदगावचा रहिवासी असून त्याचे बालपण तिथेच गेले. सध्या तो इंदिरानगर परिसरातील सुचितानगरमधील सुधा अपार्टमेंटमध्ये भाड्याच्या प्लॅटमध्ये वास्तव्यास होता. विशेष म्हणजे त्याचे वडील मधुकर खैरनार हे देखील नावाजलेले डॉक्टर आहेत. एका सुशिक्षित आणि वैद्यकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्तीचा अशा राष्ट्रीय स्तरावरील गंभीर गुन्ह्यात सहभाग असल्याचा संशयाने कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.
एजंटची भूमिका : प्रती पेपर ५ लाख कमावल्याचा संशय
खैरनार याने जयपूरहून आलेली प्रश्नपत्रिका मोबाइलने इतर काही लोकांना पाठवल्याचा संशय आहे. त्याने केवळ एजंटची भूमिका बजावल्याचे प्रथमदर्शनी दिसते. यासाठी १० लाखांची प्रश्नपत्रिका खरेदी करून ती दुसऱ्यांना १५ लाखांत विकल्याचा संशय तपास पथकाला आहे. मास्टरमाइंडचा सीबीआय तपास करत आहे.
