माहेरी आलेल्या विवाहितेचा पतीकडून खून; नंतर पतीची आत्महत्या, तीन चिमुकले पोरके
नांदेड : हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी तांडा येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. चुलत भावाच्या लग्नासाठी माहेरी आलेल्या विवाहितेचा तिच्याच पतीने धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावावर शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन लहान मुले पोरकी झाली आहेत.
पायल विनोद राठोड (वय २७) या आपल्या पती विनोद राठोड आणि तीन मुलांसह चुलत भावाच्या लग्नासाठी माहेर असलेल्या बोरगडी तांडा येथे आल्या होत्या. घरात लग्नाचा आनंद, नातेवाईकांची लगबग आणि उत्साहाचे वातावरण असतानाच अचानक घडलेल्या या घटनेने आनंदाचे रूपांतर शोकात झाले.
माहितीनुसार, ११ मे रोजी रात्री पायल आणि विनोद या पती-पत्नीमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की संतापाच्या भरात विनोद राठोड याने धारदार शस्त्राने पत्नी पायलचा गळा चिरून तिचा जागीच खून केला. घटना घडल्यानंतर तो रात्रीच फरार झाला होता.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी धानोरा शिवारातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत विनोद राठोड याचा मृतदेह आढळून आला. पत्नीचा खून केल्यानंतर अपराधी भावनेतून त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
या दाम्पत्याला दोन लहान मुली आणि अवघा आठ महिन्यांचा मुलगा आहे. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तीनही चिमुकल्यांच्या भवितव्याबाबत हळहळ व्यक्त होत आहे. घटनेनंतर बोरगडी तांडा परिसरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Post Views: 160
