‘नीट’ परीक्षा रद्द; विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण

0
Untitled-1.jpg


नांदेड (प्रतिनिधी) – वैद्यकीय शिक्षणासाठी महत्त्वाची मानली जाणारी ‘नीट’ परीक्षा ३ मे २०२६ रोजी देशभरात पार पडली होती. नांदेड जिल्ह्यातील ४६ परीक्षा केंद्रांवर तब्बल १५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटीच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात एकूण १५ हजार ८४० विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. यामध्ये नांदेड शहरातील २४ तर ग्रामीण भागातील २२ परीक्षा केंद्रांचा समावेश होता. वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी अनेक वर्षे कठोर परिश्रम घेत असतात. त्याचबरोबर पालकही मोठ्या अपेक्षेने मुलांना कोचिंग, राहण्याची व्यवस्था आणि अभ्यासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतात.

दरम्यान, पेपरफुटीच्या संशयामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण वाढला आहे. विविध राज्यांमध्ये पेपरफुटीबाबत चर्चा सुरू असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अभ्यासाची तयारी करावी लागणार आहे. अनेक विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर आपल्या गावी परतले होते. आता पुन्हा कोचिंग क्लासेस, निवास व्यवस्था आणि अभ्यासाचा अतिरिक्त ताण त्यांच्यावर येणार आहे.

नवीन परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नसले तरी पुढील काही आठवड्यांत परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने विद्यार्थ्यांकडून पुन्हा कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना पूर्वीच्या परीक्षा केंद्रावरच पुन्हा परीक्षा देता येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

या संपूर्ण प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, वारंवार होणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.


Post Views: 36






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed