पुण्यात बिबवेवाडीत मंडप गोडाऊनला भीषण आग:7 दुचाकी, टेम्पो खाक; अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला

0
357766d0-7ee1-4073-8b74-cc4c98bc08f1_1778585705908.jpg




पुणे शहरातील बिबवेवाडी येथील अप्पर डेपो परिसरातील एका मोठ्या मंडप गोडाऊनला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. ८ हजार चौरस फुटांच्या या गोडाऊनमध्ये सजावटीचे साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. मात्र, पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग आजूबाजूच्या दाट वस्तीत पसरण्यापासून रोखली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मंगळवारी दुपारी १:२३ वाजता बिबवेवाडी, अप्पर डेपो येथील ओसवाल दवाखान्यासमोर असलेल्या ‘काळे अँड सन्स’ मंडप गोडाऊनला आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला मिळाली. गोडाऊनमध्ये कार्पेट, कापड आणि इतर सजावटीचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीची तीव्रता प्रचंड होती. धुराचे लोट लांबूनही दिसत असल्याने परिसरात घबराट पसरली होती. या आगीत गोडाऊनमधील सजावटीच्या साहित्यासह तिथे उभा असलेला एक चारचाकी टेम्पो आणि सात दुचाकी वाहने जळून खाक झाली. सुदैवाने, अग्निशमन दलाने तातडीने कार्यवाही केल्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा कोणीही जखमी झाले नाही. आगीचे गांभीर्य ओळखून मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ अग्निशमन वाहने, ३ वॉटर टँकर आणि महापालिका पाणी पुरवठा विभागाचे ११ टँकर घटनास्थळी दाखल झाले. पुणे कॅन्टोन्मेंट अग्निशमन दलाचेही एक वाहन मदतीला आले होते. अधिकारी विजय भिलारे, समीर शेख, सुनील नाईक नवरे, कैलास शिंदे आणि सुमारे ५० जवानांनी अथक परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळवले. या कामात स्थानिक नागरिक, पोलीस आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की, “आगीची भीषणता आणि आजूबाजूची नागरी वस्ती पाहता धोका मोठा होता. नियंत्रण कक्षात नागरिकांचे सतत फोन येत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तातडीने जादा कुमक पाठवली आणि आग इतरत्र पसरू न देता त्यावर नियंत्रण मिळवले. यामुळे मोठी हानी टळली.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *