जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग 'पांढरा हत्ती':अनेक वर्षांपासून विनावापर, त्वरित निर्णय घेण्याची मागणी

0
ea7485d5-d425-4649-af35-c484729f3c44_1778586491006.jpg




शहरातील जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग प्रकल्प अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहे. या प्रकल्पावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खर्डेकर यांच्या निवेदनानुसार, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर २००७ साली उभारण्यात आलेला हा प्रकल्प सुरुवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे वापरला गेला नाही. त्यावेळी यांत्रिक पार्किंगबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम होता आणि पार्किंगची समस्याही आजच्या इतकी गंभीर नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प ‘पांढरा हत्ती’ ठरल्याचा आरोप करत त्यावेळी आंदोलनेही झाली होती. गेल्या दोन दशकांत शहरातील परिस्थिती बदलली असली तरी, हा प्रकल्प बहुतांश काळ बंदच राहिला आहे. दोन वर्षांपूर्वी याबाबत पाठपुरावा केला असता, मेट्रो प्रशासनासोबत चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, सद्यस्थितीत ही यंत्रणा पूर्णपणे निष्क्रिय असून, परिसरात कचरा साचलेला दिसत आहे. तज्ञांच्या मते, सध्याच्या मोठ्या आकाराच्या वाहनांमुळे या जुन्या यंत्रणेत पार्किंग करणे अवघड आहे. तसेच, आर्थिकदृष्ट्याही हा प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे मत व्यक्त होत आहे. त्यामुळे या जागेचे नूतनीकरण करण्याऐवजी पर्यायी उपयोगाचा विचार करावा, अन्यथा पुन्हा ‘पांढरा हत्ती’ निर्माण होईल, अशी भूमिकाही खर्डेकर यांनी मांडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *