दौंड-मनमाड रेल्वे मार्गासाठी 15 मीटर जागेचे संपादन:मनमाड शहरातील 1200 रहिवाशांना दिलासा
![]()
दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी मनमाड शहरातील सर्व्हे नंबर २५५ आणि २५६ मधील शेकडो घरे व दुकाने जमीनदोस्त होणार, या चर्चेने महिन्याभरापासून हजारो नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, सोमवारी रेल्वे प्रशासन व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त पाहणीनंतर या सर्व चर्चा फोल ठरल्या आहे. रेल्वे केवळ १५ मीटर जागा संपादित करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दौंड-मनमाड लोहमार्गाचे दुहेरीकरण अंतिम टप्प्यात आहे. मनमाड स्थानकात हा मार्ग जोडण्यासाठी वाघदर्डीरोड, आयुष पॅलेस परिसरातून ‘रिंगरोड’च्या धर्तीवर नवीन ट्रॅक टाकला जाणार आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणावर खासगी जागा संपादित केली जाणार असल्याच्या नोटीस मिळाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. नागरी वस्ती, पक्की घरे आणि मंदिरे धोक्यात असल्याची भीती व्यक्त होत होती. सोमवारी रेल्वेचे मुख्य अभियंता सुधांशू कुमार, भूमी अभिलेखचे रवींद्र बर्डे, नगरपालिकेचे अभियंता अनिल गवळी यांच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी नगरसेवक अमोल नरवडे, नाना शिंदे, बबन सांगळे आदी उपस्थित होते. मर्यादित संपादन: रेल्वे हद्दीपासून केवळ १५ मीटर रुंदीची व २ किमी लांबीची पट्टी संपादित करणार आहे. नुकसान टळले: या निर्णयामुळे वस्तीमधील शेकडो पक्की घरे आणि व्यापारी प्रतिष्ठाने पाडण्याची भीती आता मावळली आहे.
