पैठण एमआयडीसीमधील केमिकल कंपनीमध्ये स्फोट; 2 कामगार भाजले:अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लिमिटेडमधील घटना, जीवितहानी नाही‎

0
transfar_transfar_transfar_app_17785080346a01e1022bfe4_1002078957.jpg




पैठण एमआयडीसी परिसरातील अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लि. या केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी ३ वाजता रिअॅक्टर फुटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कंपनीतील दोन कामगार गंभीररीत्या भाजले. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील उत्पादन प्रक्रियेदरम्यान अचानक रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात केमिकल उडाले. ते कामगार स्वामी कणसे व जगदीश कांबळे यांच्या अंगावर पडले. त्यामुळे दोघेही भाजून जखमी झाले. घटनेनंतर कंपनी प्रशासनाने तत्काळ त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. कंपनीचे मालक विजय इंदरगी यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिस ठाणे एम, पैठण येथे रात्री उशिरापर्यंत वैद्यकीय अहवाल (एमएलसी) प्राप्त झालेला नसल्याचे सपोनि ईश्वर जगदाळे यांनी सांगितले. एमएलसी आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एक वर्षात पैठण एमआयडीसीत चार ते पाच आगीच्या घटना घडल्या. यात दोन कामगारांना जीव गमवावा लागला होता, तरीही स्थानिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा उभारण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे एकच अग्निशमन गाडी एमआयडीसीत आहे तर मोठ्या आगीच्या घटना घडल्यानंतर संभाजीनगर येथील अग्निशमन विभागाच्या गाड्या बोलवाव्या लागतात. ^एमआयडीसीमधील केमिकल कंपन्यांत अनेक वेळा स्फोट झालेले आहेत. कामगारांच्या सुरक्षा संदर्भात उपाययोजनासाठी कंपनी व्यवस्थापक यांना सूचना करण्यात येतील. -ईश्वर जगदाळे सपोनि एमआयडीसी पैठण दरम्यान, एमआयडीसी परिसरातील काही केमिकल कंपन्यांमध्ये यापूर्वीही अशा प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत. मात्र, तरीही अनेक कंपन्यांमध्ये सुरक्षाविषयक उपाययोजना अपुऱ्या असल्याचा आरोप स्थानिक नागरिक व कामगारांकडून केला जात आहे. केमिकल उद्योगांमध्ये सुरक्षा मानकांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी कामगारांनी केली आहे. या कंपनीमध्ये स्फोट होऊनही आतमध्ये कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे या स्फोटात कंपनीचे किती नुकसान झाले, हे कळू शकले नाही. कंपन्यांचे कामगार सुरक्षेकडे कायम दुर्लक्ष पैठण एमआयडीसीमधील अनेक केमिकल कंपन्यांमध्ये कामगारांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. कंपनीमध्ये सुरक्षा यंत्रणा उभारण्याची मागणी येथील कामगार संघटनेच्या वतीने आज करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed