प्रेमप्रकरणाच्या वादातून युवकाला मारहाण; दागिने, मोबाईल व स्कुटी लंपास
नांदेड (प्रतिनिधी )- भाग्यनगर परिसरात प्रेमप्रकरणाच्या कारणावरून युवकाला बोलावून जबरी मारहाण करत त्याच्याकडील दागिने, मोबाईल आणि स्कुटी जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ६.१५ वाजण्याच्या सुमारास श्रीनगर, नांदेड येथील एका दुकानासमोर घडली. आरोपी ऋषी सोनकांबळे, साई आणि अन्य एका अनोळखी इसमाने संगनमत करून फिर्यादीला प्रेमप्रकरणातील ब्लॅकिंगबाबत चर्चा करायची आहे असे सांगून दुकानासमोर बोलावले. त्यानंतर फिर्यादीला वसरणी येथील पेट्रोल पंपाजवळील मोकळ्या जागेत नेऊन त्याला मारहाण करण्यात आली.
आरोपींनी फिर्यादीच्या हातातील सुमारे दोन हजार रुपये किमतीची चांदीची अंगठी, कानातील दहा हजार रुपये किमतीची सोन्याची बाली, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन तसेच पन्नास हजार रुपये किमतीची स्कुटी असा एकूण मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेल्याचा आरोप आहे. तसेच आरोपींनी फिर्यादीच्या नातेवाईकांना मोबाईल व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधून वेगवेगळ्या रकमेची मागणी केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फिर्यादी आदित्य देवानंद मद्देवार (वय २४, रा. भवितव्य नगर, नांदेड) यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ३०९(६), ३०८(४), ११८(२), ११८(१), २९६, ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक केंजीर हे करीत आहेत.
