१२ कोटींच्या शेतजमिनीवर बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक; आठ जणांविरुद्ध गुन्हा
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ९ मे २०२६ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पिंपळगाव महादेव शेत परिसरात आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या शेतात प्रवेश केला. संबंधित जमीन आम्ही खरेदी केली असल्याचे सांगत त्यांनी जमिनीचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करून धमकावल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी रेखा धीरज पवार, धीरज कुंदन पवार, आशिष चारभाई, सागर कोवळा चौघे, गणेश वैजनाथ रूपके, मनमिंदरसिंग उर्फ मॉन्टीसिंग जहागीरदार, विठ्ठल घोडके तसेच इतर आठ ते दहा अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी अतुल मोहनराव पवार (वय ४२, रा. एचआयजी कॉलनी, नांदेड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३१/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक ढेमकवाड हे करीत आहेत.
