पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई:११ महिन्यांत ९४ जणांना अटक; फरासखाना पोलिसांची धडक कामगिरी
![]()
पुणे शहर पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्धची शोधमोहीम तीव्र केली आहे. फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या ११ महिन्यांत एकूण ९४ बांगलादेशी नागरिकांना विविध कारवायांमध्ये अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशांनुसार, फरासखाना पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत भसमे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ११ मे रोजी रात्री १ ते सकाळी ९ या वेळेत बुधवार पेठ येथील रेड लाईट एरियात ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले. या कारवाईदरम्यान, माचीस बिल्डिंगमध्ये काही बांगलादेशी महिला विनापरवाना राहत असल्याची गुप्त माहिती पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली. पोलिसांनी या इमारतीवर छापा टाकला असता, तिथे २३ ते ३५ वयोगटातील पाच महिला संशयास्पद रितीने वास्तव्य करताना आढळल्या. त्यांच्याकडे कोणत्याही स्वरूपाचे वैध पारपत्र (पासपोर्ट) किंवा व्हिसा मिळून आला नाही. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत असे समोर आले की, या महिलांनी बांगलादेश सीमा अवैधरीत्या ओलांडून भारतात प्रवेश केला होता. उदरनिर्वाहासाठी त्या बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत होत्या. त्या बांगलादेशी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे. परिमंडळ १ चे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या ११ महिन्यांच्या कालावधीत पुणे शहर पोलिसांनी सातत्याने विविध पोलिस स्टेशनच्या हद्दीत छापे टाकून एकूण ९४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त ऋषीकेश रावले, आणि सहाय्यक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, उपनिरीक्षक अरविंद शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली.
