पुरंदर विमानतळाचा मार्ग मोकळा:९८% शेतकऱ्यांची जमिनी देण्यास संमती, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

0
b2318560-a35a-41e6-9f23-7b63207c9aeb_1778494051552.jpg




पुणेकरांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या पुरंदर विमानतळ प्रकल्पाला आता गती मिळणार आहे. या विमानतळाच्या भूसंपादनासाठी तब्बल ९८ टक्के शेतकऱ्यांनी आपली संमती दर्शवली आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांच्या या सहमतीमुळे प्रकल्पाच्या मार्गातील एक प्रमुख अडथळा दूर झाला असून, विमानतळाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. यामुळे प्रकल्पाच्या पुढील कामांना वेग येईल, अशी अपेक्षा आहे. यावेळी बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानले. पंतप्रधानांनी देशाला आणि राज्याला एक सकारात्मक संदेश दिला असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान मोदींची ‘स्वदेशी’ची भूमिका महात्मा गांधींच्या सल्ल्यासारखीच आहे. पेट्रोल आणि डिझेलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर वाढवण्यावर भर दिला पाहिजे, असे बावनकुळे यांनी नमूद केले. तसेच, सौर ऊर्जेचा मोठा स्रोत उपलब्ध असल्याने सौर ऊर्जेवरील शेगड्यांचा वापर वाढवण्याचे आवाहनही त्यांनी केले. आर्थिक संस्कारांबद्दल बोलताना ‘बचत’ ही आपली संस्कृती असल्याचे त्यांनी सांगितले. परदेशातून सोने-चांदी खरेदी करण्याऐवजी देशांतर्गत पर्यायांचा विचार करण्याचे आवाहनही बावनकुळे यांनी केले. बहुचर्चित अमेडिया प्रकरणावर भाष्य करताना बावनकुळे म्हणाले की, हे प्रकरण सध्या न्यायालयात आहे. याबाबतचा सर्व पारदर्शक अहवाल विधिमंडळात सादर केला आहे. झालेली कारवाई पूर्णपणे कायद्यानुसार आणि नियमांना धरूनच झाली आहे. या कारवाईमुळे राज्यातील सरकारी जमिनीला यापुढे कोणीही हात लावणार नाही, असा स्पष्ट संदेश गेला असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधी यांच्या टीकेचा समाचार घेताना बावनकुळे म्हणाले की, “कदाचित राहुल गांधींना पुन्हा विदेशात फिरायला जायचे असेल, म्हणूनच ते अशा प्रकारची राजकीय टीका करत असावेत.” दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आम्हाला ताफ्याची किंवा गाड्यांची काळजी नाही, ताफा नसला तरी आम्हाला चालते,” असे म्हणत त्यांनी प्रोटोकॉलपेक्षा कामाला महत्त्व असल्याचे अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed