देगलूरमध्ये जुगार क्लब पत्रकांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ

0
WhatsApp-Image-2026-05-11-at-13.42.23.jpeg


नगराध्यक्षांसह कुटुंबीयांवर गंभीर आरोप; व्हायरल व्हिडिओंनी चर्चेला उधाण

देगलूर (प्रतिनिधी)- देगलूर शहरात अज्ञातांकडून नगराध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप करणारी पत्रके (पॉम्पलेट) शहरभर वाटण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकांमध्ये थेट नगराध्यक्षा विजयमाला टेकाळे, त्यांचे पती बालाजी टेकाळे आणि भाऊ लक्ष्मण टेकाळे यांच्या नावांचा उल्लेख करत त्यांच्या खासगी जागेवर कथित जुगार क्लब सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे देगलूरसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आले आहे.

शहरातील विविध भागांत ही पत्रके मोठ्या प्रमाणावर फेकण्यात आल्याचे दिसून आले. काही ठिकाणी रस्त्यांवर पडलेल्या पत्रकांचे व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असून, हे व्हिडिओ सध्या मोठ्या वेगाने फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता, संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या पत्रकात केवळ जुगार क्लबच नव्हे तर त्या ठिकाणी दारू व महिलांची व्यवस्था केली जात असल्याचेही धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पत्रकावर कोणाचेही नाव अथवा संघटनेचा उल्लेख नसल्याने हे पत्रक नेमके कोणी आणि कोणत्या हेतूने वाटले, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राजकीय सूडबुद्धी, स्थानिक गटबाजी की प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न, यावरून शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाबाबत देगलूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांनी अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झाली नसल्याचे स्पष्ट केले. तसेच देगलूरमध्ये असा कोणताही प्रकार सुरू नसल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमुळे आणि शहरभर वाटण्यात आलेल्या पत्रकांमुळे या प्रकरणाने मोठे राजकीय व सामाजिक स्वरूप धारण केले आहे. सध्या या पत्रकांमागील अज्ञात हात कोणाचा, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पोलीस यंत्रणा याबाबत तपास करणार का, याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे.

संबंधित व्हिडीओ ..



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *