बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी कारवाई:18 महिन्यांनंतर अंगरक्षक सेवेतून बडतर्फ; बिश्नोई कनेक्शन असलेल्या प्रकरणात मोठी ॲक्शन
![]()
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात दीड वर्षानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हल्ल्यावेळी बाबा सिद्दीकी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस हवालदार श्याम सोनवणे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा आणि बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. श्याम सोनवणे हे मुंबई पोलिसांच्या संरक्षण आणि सुरक्षा विभागात कार्यरत होते. या घटनेनंतर त्यांच्यावर विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अखेर त्यांच्यावर सेवाबाह्य करण्याची कारवाई करण्यात आली आहे. 12 ऑक्टोबर 2024 रोजी वांद्रे पूर्वेतील खेरवाडी परिसरात बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यांच्या मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात बाबा सिद्दीकी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमागे गँगस्टर अनमोल बिश्नोई याचे नाव समोर आले होते. या प्रकरणात आतापर्यंत 27 आरोपींना मोक्का अंतर्गत अटक करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी श्याम सोनवणे हे बाबा सिद्दीकी यांचे अंगरक्षक म्हणून ड्युटीवर होते. मात्र हल्ला झाल्यानंतर त्यांनी तातडीने प्रतिकार केला नाही किंवा परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला नाही, असा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत 18 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर विभागीय चौकशी सुरू झाली. चौकशीत निष्काळजीपणा सिद्ध झाल्यानंतर 29 सप्टेंबर 2025 रोजी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. अखेर 30 एप्रिल 2026 रोजी त्यांना सेवेतून कमी करण्याचा आदेश काढण्यात आला आणि 2 मे रोजी त्यांनी तो स्वीकारला. मुंबई पोलिसांच्या अधिकृत आदेशात नमूद करण्यात आले आहे की, हल्ल्याच्या वेळी सोनवणे यांनी अपेक्षित दक्षता घेतली नाही. बाबा सिद्दीकी यांना ‘2+1’ अशी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. दिवसा दोन आणि रात्री एक सुरक्षा कर्मचारी तैनात असायचा. मात्र हल्ल्याच्या दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास एक सुरक्षा रक्षक निघून गेला होता. त्यामुळे रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या हल्ल्यावेळी सोनवणे हे एकटेच उपस्थित होते. त्यांच्यासोबत कोणताही खासगी सुरक्षा रक्षक किंवा बाऊन्सर नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. चौकशीदरम्यान सोनवणे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबात परिसरात दसऱ्याच्या मिरवणुका आणि फटाक्यांचा मोठा आवाज सुरू असल्याने हल्लेखोरांची हालचाल ओळखता आली नाही, असे सांगितले होते. मात्र पोलिसांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरला नाही. सुरक्षेची जबाबदारी असताना अधिक सतर्क राहणे अपेक्षित होते, असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि कटकारस्थानाचा तपास बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण राज्यभर गाजले होते. या घटनेनंतर मुंबईतील व्हीआयपी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता या प्रकरणात पोलिस दलातील कर्मचाऱ्यावरच मोठी कारवाई झाल्याने पुन्हा एकदा या हत्याकांडाची चर्चा सुरू झाली आहे. तपास यंत्रणांकडून अजूनही या प्रकरणातील काही धागेदोरे तपासले जात असून, अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि कटकारस्थानाचा तपास सुरूच आहे.
