अंजली दमानिया यांचाही सरकारवर निशाणा:तुम्ही विमानाने फिरायचे, ताफा मिरवायचा अन् आम्हाला इंधन वाचवण्यास सांगायचे हे चालणार नाही
![]()
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला इंधनाची काटकसर करण्याचा सल्ला देण्यापेक्षा त्याची सुरुवात त्यांनी स्वतःपासून व आपल्या नेत्यांपासून करावी, अशा शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पंतप्रधानांच्या जनतेला काटकसर करण्याच्या आवाहनाचा समाचार घेतला आहे. पंतप्रधानांनी आपण जे बोलतो ते स्वतः करावे. तुम्ही व तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी स्वतः विमानाने फिरायचे, रॅली घ्यायच्या, गाड्यांचा ताफा मिरवायचा आणि आम्हाला इंधन वाचवण्याचा सल्ला द्यायचा हे चालणार नाही, असेही दमानिया यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले. आपल्याकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत. त्यामुळे सध्याच्या जागतिकि संकटाचा भारतावर अधिक परिणाम होत आहे. त्यामुळे आपण स्वयंपाकाचे तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस आदींचा कमी वापर केला पाहिजे. यावर उपाय म्हणून ज्या शहरांत मेट्रो आहे, तेथील लोकांनी मेट्रोचा वापर करावा. बैठकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व वर्क फ्रॉम होम सारख्या पर्यायांचा वापर करावा, असे ते म्हणाले. अंजली दमानिया यांनी त्यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. जनतेला सल्ला देण्यापेक्षा सुरुवात स्वतःपासून करा अंजली दमानिया म्हणाल्या, आपल्या देशाच्या पंतप्रधानपदाचा आदर आहे म्हणून मी त्या विषयी केव्हाही अशी – तशी विधाने करत नाही. पण कालचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकले. त्यात त्यांनी जनतेला सांगितले की, इंधन वाचवा, मेट्रोचा वापर करा, गाड्या वापरू नका, सोने खरेदी करू नका. अगदी इतकेही म्हणाले की, घरी खाण्याचे तेलही कमी वापरा. परदेश प्रवास टाळा, पण ते आणि त्यांचा पक्ष काय करत आहेत याचा त्यांनी थोडाही विचार करू नये का? ते काल तेलंगणा, बंगळुरू व जामनगर या 3 ठिकाणी गेले. प्रत्येक ठिकाणी त्यांनी प्रचारसभा घेतल्या. ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात. तिथे गेल्यानंतर त्यांचा 40-50 गाड्यांचा ताफा असतो. हे करणे कितपत योग्य आहे. इतकच नाही तर आता ते शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, इटली, यूएई अशा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे एक सामान्य स्त्री म्हणून मला हा प्रश्न पडला आहे की हे योग्य आहे का? आपण जे काही बोलतो त्याची सुरुवात आपण स्वतःपासून करू नये का? त्यांना तसे करायचे असेल, तर त्यांनी स्वतः वागून दाखवावे. त्यांनी आपल्या नेत्यांना दौरे बंद करा, चार्टर्ड प्लेन वापरू नका असे सांगावे. तुम्ही सामान्य प्रवाशी विमानाने जात जा. अगदीच नाईलाज झाला तर तेव्हा वापरत जा, असे सांगावे. पण ते तसे करताना दिसत नाही. पण जनतेला मात्र सर्वजण सल्ले देत आहेत. हे सर्व पाहून दुःख होत आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. अशोक खरात प्रकरणावरही व्यक्त केला संताप उल्लेखनीय बाब म्हणजे अंजली दमानिया यांनी रविवारीच भोंदू अशोक खरात प्रकरणात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या, अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आप पाहतो त्यापेक्षा खूप मोठी आहे. या प्रकरणात केवळ 9 महिलांची चौकशी होणार असे पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर मी पोलिस महासंचालकांना पत्र लिहून मनी लाँड्रिंग, रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर आदींची चौकशी करणार? असा प्रश्न केला होता. या प्रकरणाचा राजकीय गैरवापर न होता सत्य जनतेपुढे आले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
