ग. दि. माडगूळकरांची 'पंचवटी' बिल्डरला विकण्याचा घाट:विरोध केल्याने जीवाला धोका, सुमित्र माडगूळकरांचे नातेवाईकांवर आरोप
![]()
कवी ग. दि. माडगूळकर (गदिमा) यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘गीतरामायणा’ची आणि अनेक अजरामर कलाकृतींची साक्ष असलेली पुण्यातील शिवाजीनगर येथील ‘पंचवटी’ ही ऐतिहासिक वास्तू पाडण्याचा घाट घातला जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पैशांच्या लालसेपोटी घरातीलच जवळच्या नातेवाईकांकडून ही वास्तू बिल्डरला विकण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप गदिमांचे नातू सुमित्र माडगूळकर यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट लिहून आपली व्यथा मांडली आहे. गदिमांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले की, गदिमांनी हयात असताना असे म्हंटले होते की जोपर्यंत माझे घर पंचवटी आहे तो पर्यंत माझे अस्तित्व या जगात राहील.गदिमांची पवित्र वास्तू पंचवटी पाडावी/ बिल्डरला विकावी असा दबाव आमच्या घरातील अगदी जवळच्या नातेवाईकांकडून (अगदी ते लोक ज्यांनी पंचवटीवर, गदिमांवर मोठी मोठी पुस्तके लिहिली आहेत ते या कटात सामील आहेत,केवळ लोकांना दाखवायला ते गदिमांचा वारसा सांगतात पण प्रत्यक्षात त्यांचे पंचवटी पाडण्याचे प्रयत्न चालू आहेत).माझ्यावर गेले काही महिने याच्यावरून दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे त्याला मी माझ्या जीवात जीव असे पर्यंत विरोध करतो आहे विरोध करणार आहे.गदिमांची वास्तू मी पाडू अथवा विकू देणार नाही.केवळ पैशांसाठी हे लोक गदिमांची पवित्र वास्तू पाडत आहेत. खोटे नाटे आरोप करून बदनामीचा प्रयत्न सुमित्र माडगुळकर म्हणाले, ज्या पवित्र वास्तूमध्ये गीतरामायण लिहिले गेले जी अनेक साहित्यिक कलाकृतींची साक्षी आहे.गदिमांचा अनेक वर्षांचा सहवास ज्या वास्तूला लाभला ती पाडावी म्हणून हे लोक प्रयत्न करत आहेत व त्याला मी विरोध केल्यामुळे आता माझ्या जीवावर उठले आहेत. यात माझा जीव गेला तरी बेहत्तर. या लोकांनी आता माझी बदनामी सुरू केली आहे मी व माझ्या कुटुंबावर खोटे नाटे आरोप करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे. आमच्या कुटुंबातील ज्या बायका संसारात सुखी नाहीत त्यांनी खोट्या नाट्या पोस्ट टाकून माझी बदनामी सुरू केली आहे. सुमित्र माडगुळकर म्हणाले, ज्या आजीवर आपल्या सख्ख्या नातीचा लैंगिक छळ केल्याच्या गुन्हा दाखल आहे व पंचवटीवर जिने भलेमोठे पुस्तक लिहिले आहे, त्या बाईंचा दाखला देऊन तिचा आम्ही छळ करतो, असा खोटा आरोप मी केवळ गदिमांची पवित्र वास्तू पाडायला विरोध करतो आहे म्हणून मी व माझ्या पत्नीवर करत आहेत. माझ्या कुटुंबाच्या जीवावर उठले आहेत. खोटे नाटे कितीही ओरडून सांगितले तरी ते सत्य नसते, हे आज न उद्या समोर येईलच. जीव घेतला तरी वास्तू पाडू देणार नाही सुमित्र माडगुळकर म्हणाले, गेली १० वर्षे मी गदिमांच्या स्मारकासाठी लढतो आहे व माझ्या लढ्यामुळे स्मारकाची इमारत आता पूर्ण झाली आहे. आतल्या कामाला आता सुरुवात होईल. गदिमांचे स्मारक जितके महत्त्वाचे आहे तितकीच गदिमांची पंचवटी माझ्या साठी एक देऊळ आहे. या लोकांनी माझी कितीही बदनामी केली, माझा जीव जरी घेतला तरी ही वास्तू मी पाडू देणार नाही. माझी कितीही बदनामी करा, माझ्यावर कोर्ट केसेस करा, मी लढत राहीन. पण तुमचा उद्देश सफल होऊ देणार नाही. पडद्यामागे कारवाया करणाऱ्यांना इशारा गदिमांचा आशिर्वाद माझ्या पाठीशी आहे व मी ही वास्तू बिल्डर ला विकू देणार नाही. हे या सर्व केवळ गदिमांचे खोटे नाव घेऊन वारसा सांगणाऱ्या लबाड लांडग्यांनी म्हणजेच पडद्यामागे कारवाया करणाऱ्या नातेवाईकांनी समजावे. हिंमत असेल तर गदिमांच्या पंचवटीला हात लाऊन दाखवा. तुम्हाला माझे चॅलेंज आहे, असे आवाहन करतानाच, गदिमांवर अतोनात प्रेम करणाऱ्या मराठी रसिकांचे आम्हाला आशिर्वाद मिळतील, असा विश्वास सुमित्र माडगुळकर यांनी व्यक्त केला.
