तुम्ही पालिका सभागृहात गप्प का बसलात?:महापौर बंगल्याच्या नूतनीकरणावरून उद्धव ठाकरे नगरसेवकांवर संतापले
![]()
मुंबई महापालिकेच्या महापौर बंगल्याच्या नूतनीकरणाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. मात्र, याच मुद्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याच नगरसेवकांवर आगपाखड केली आहे. “जनतेच्या पैशांचा अपव्यय होत असताना तुम्ही सभागृहात गप्प कसे बसलात?” असा संतप्त जाब विचारत ठाकरेंनी नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईचे महापौर निवासस्थान हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी देण्यात आल्याने, महापौरांचे निवासस्थान भायखळ्याला हलविण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून पालिकेवर प्रशासक असल्याने हे निवासस्थान बंद होते. मात्र, मुंबई महापालिकेची सत्ता प्रथमच भारतीय जनता पक्षाच्या हाती गेल्यानंतर नवनियुक्त महापौर रितू तावडे यांनी या बंगल्याच्या नूतनीकरणाचे काम काढले आहे. या नूतनीकरणासाठी तब्बल ३ कोटी ४० लाख रुपयांहून अधिक खर्च प्रस्तावित आहे. विशेष म्हणजे, केवळ जानेवारी महिन्यात ७५ लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पूर्वी लाखांमध्ये होणारा खर्च आता कोटींच्या घरात गेल्याने यावरून राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना विचारला जाब महापौर रितू तावडे यांच्या या निर्णयामुळे विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला असला, तरी आपल्या पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात अपेक्षित आक्रमकता दाखवली नाही, असे उद्धव ठाकरे यांचे मत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरेंनी काही प्रमुख नगरसेवकांना बोलावून त्यांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. जनतेच्या कष्टाचा पैसा अशा प्रकारे उधळला जात असताना तुम्ही शांत का राहिलात? सभागृहात हा मुद्दा आक्रमकपणे का मांडला गेला नाही? विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडण्यात कसूर का झाली? अशी विचारणा उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांना केली. नगरसेवकांच्या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे नाराज ठाकरेंची अनेक वर्षांची सत्ता उलथवून लावत भाजपने पहिल्यांदाच मुंबई महापालिकेची सूत्रे हाती घेतली आहेत. अशा परिस्थितीत महापौरांच्या खर्चाचा मुद्दा हा शिवसेनेसाठी ठाकरे गटाला भाजपला कोंडीत पकडण्याची मोठी संधी होती. मात्र, पक्षाच्या नगरसेवकांनी दाखवलेल्या मवाळ भूमिकेमुळे उद्धव ठाकरे प्रचंड नाराज असल्याचे सांगितले जात आहे.
