विकास लवांडेंवरील हल्लेखोरांवर कारवाई करा:शरद पवारांचा पोलिस महासंचालकांसह पुणे पोलिस आयुक्तांना फोन; मुख्यमंत्र्यांनाही भेटणार
![]()
वारकरी संप्रदायातील कथित घुसखोरांविरोधात रान छेडल्यामुळे शाईफेक हल्ल्याला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आज पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांसह पुणे पोलिस आयुक्तांशी फोनवरून संवाद साधून आरोपींवर कारवाई करण्याची केली. तसेच लवांडे यांना कायमस्वरूपी पोलिस संरक्षण देण्याचीही मागणी केली. शरद पवार हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीतही मांडणार आहेत. विकास लवांडे शनिवारी सकाळी आळंदी मातोबा तालुका हवेली येथे प्रवचनासाठी गेले होते. तेथील प्रवचन संपल्यानंतर ते पुण्याला परत जात होते. रस्त्यात 3 गाड्यांमधून आलेल्या संग्राम भंडारे व 10-15 गोरक्षकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर शाईफेक केली. त्यांना धक्काबुक्की केली. विकास लवांडे यांनी हल्लेखोरांनी आपल्याला पिस्तुल दाखवत जिवे मारण्याची धमकीही दिली. त्यानंतर ते पळून गेले. या घटनेचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटलेत. या पार्श्वभूमीवर विकास लवांडे यांनी आज सकाळी शरद पवारांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विकास लवांडेंनी घेतली पवारांची भेट विकास लवांडे यांनी या भेटीची माहिती देताना सांगितले की, ज्येष्ठ नेते आदरणीय पद्मविभूषण शरद पवार साहेबांनी मला बोलून घेतले होते. पुण्यात मोदी बागेत आज मी सकाळी साहेबांची भेट घेतली माझ्यावर संग्राम भंडारे आणि त्या गुंडांनी केलेल्या हल्ल्या संदर्भातली जी काही घटनाक्रम आहे तो सर्व साहेबांना सांगितला साहेबांनी राज्याचे पोलिस महासंचालक आणि पुणे पोलिस आयुक्तांना फोन करून आरोपींवर कारवाई करण्याची आणि मला कायमस्वरूपी पोलिस संरक्षण देण्याची मागणी केली. त्याचबरोबर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठक होणार असून त्या बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याचे साहेबांनी मला सांगितले. तसेच हा वैचारिक तात्विक पातळीवरचा लढा असाच सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने चालू ठेवावा विचारांची लढाई विचारांनी आपण लढत राहू असे साहेबांनी मला आशीर्वाद देताना सांगितले, असे ते म्हणाले.
लवांडेंच्या केसालाही धक्का लागला तर पोलिस जबाबदार – रोहित पवार दुसरीकडे, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणी पोलिसांची भेट घेऊन विकास लवांडे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर संग्राम भंडारे आणि त्याच्या गुंडांनी केलेला हल्ला आणि शाईफेकीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यासाठी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पोलिसांची भेट घेतली. लवांडे यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली तरीही दबावाखाली असलेल्या पोलिस प्रशासनाने यासंदर्भातील आर्म ॲक्ट नुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यास नकार दिला. यावरुन पोलिसांवर किती दबाव आहे हेच दिसून येतं. असं असेल तर या गुन्ह्याचा तपास खरंच पारदर्शक पद्धतीने होईल का आणि भर दिवसा कायद्याला न जुमानता मस्ती करणाऱ्या गुंडांविरोधात कारवाई होईल का, याविषयी आमच्या मनात शंका आहे. पण या गुन्ह्याच्या तपासाकडं आमचं लक्ष राहिल. तसंच लवांडे यांच्या केसालाही धक्का लागला तर त्याची पूर्ण जबाबदारी ही पोलिस प्रशासनाची राहील, याची सरकारने नोंद घ्यावी. या हल्ल्याच्या निमित्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे दुसऱ्या राज्यातून येऊन अनेक भोंदूबाबा जगद्गुरु संत तुकाराम महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चुकीचं आणि आक्षेपार्ह बोलतात त्यावेळी हे भोंदू मूग गिळून बिळात लपून बसतात. आजच्या हल्ल्याने बंधूभाव, शांतता आणि समता प्रस्थापित करणाऱ्या वारकरी संप्रदायात स्वतःला वारकरी म्हणून घेणाऱ्या कट्टरतावादी गुंडांनी घुसखोरीच केली, हे सिद्ध झालं. त्यामुळं भविष्यात संतांचा खरा विचार जपण्यासाठी या घुसखोरांविरोधात संघर्ष करण्याची वेळ आली, हे सर्वांनीच लक्षात घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
