भावेश भाटिया देणार उद्योगाचे धडे:नेत्रहीन उद्योजक अमरावतीत, उद्या सांस्कृतिक भवनात कार्यक्रम

0
d955c556-2766-4a7d-960b-3726efa90324_1778346043789.jpg




नेत्रहीन उद्योजक भावेश भाटिया ११ मे रोजी अमरावतीकरांना उद्योग, व्यक्तित्व विकास आणि स्वप्नपूर्तीसाठी बहुमोल टिप्स देणार आहेत. शाश्वत कन्सेप्ट स्कूलतर्फे आयोजित हा कार्यक्रम श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता सुरू होईल. प्रयास सेवांकुर संस्थेचे प्रमुख डॉ. अविनाश सावजी यांनी सांगितले की, भाटिया यांनी आपल्या आईच्या प्रेरणेने ‘तुम्ही जग पाहू शकत नसाल तर काय झाले, असे काहीतरी करा की जग तुम्हाला पाहिल’ या विचाराने आपले जीवन बदलले. नेत्रहीन असूनही, भाटिया यांनी नोकरीऐवजी व्यवसायाला प्राधान्य दिले. आज त्यांनी महाबळेश्वर येथे ३५० कोटी रुपयांची उलाढाल असलेला मेणबत्ती व्यवसाय यशस्वीपणे उभा केला आहे. या व्यवसायात ते १० हजार दिव्यांग व्यक्तींना रोजगार देतात. डॉ. सावजी यांनी नमूद केले की, भाटिया यांना मेणबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी कोणी तयार नव्हते. त्यांनी प्रथम मसाजरचे प्रशिक्षण घेतले आणि त्याच प्रशिक्षकांना सेवा देऊन त्यांच्या सहवासात मेणबत्ती बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले. त्यांच्या रंगीबेरंगी आणि सुवासिक मेणबत्त्या अनिल अंबानींच्या घरापासून लंडनच्या राजवाड्यापर्यंत पोहोचल्या आहेत. ‘रुक जाना नही’ हे त्यांचे जीवनसूत्र आहे. एका डोळस महिलेशी विवाह करून त्यांनी नवीन आदर्श निर्माण केला असून, त्यांचा मुलगा आता अभियंता आहे. पत्रकार परिषदेला डॉ. सावजी यांच्यासह क्रेडाईचे निलेश ठाकरे, घरकुल मसालेचे संचालक तुषार वरणगावकर, शाश्वत कन्सेप्ट स्कुलचे अतुल गायगोले, वंदे मातरम् रक्तदान समितीचे अमीत जामोदे, अस्पा बंड सन्सचे संचालक रणजीत बंड, केमीस्ट-ड्रगीस्ट असोसीएशनचे धर्माळे, रवि पाटील आणि दिशा आय बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed