कंधार (प्रतिनिधी)- ज्या पित्याच्या खांद्यावर बसून जग पाहण्याचे स्वप्न प्रत्येक बालक पाहते, त्याच पित्याने केवळ ‘हा मुलगा माझ्यासारखा दिसत नाही’ या अघोरी संशयापोटी आपल्या ४ वर्षांच्या चिमुरड्याचा निर्घृणपणे जीव घेतल्याची हृदयद्रावक घटना नांदेड जिल्ह्यात घडली होती. या मानवतेला काळिमा फासणाऱ्या कृत्याबद्दल कंधार येथील सत्र न्यायालयाने आरोपी पित्याला मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.
नेमकी घटना काय होती? ही मन सुन्न करणारी घटना २८ मार्च २०२२ रोजी कंधार तालुक्यातील मौजे नारनाळी येथे घडली. आरोपी माधव देव्हारे याला दोन मुले होती. मात्र, धाकटा मुलगा अभिषेक (वय ४ वर्ष) हा आपल्यासारखा दिसत नाही, या संशयाने माधवच्या मनात घर केले होते. घटनेच्या दिवशी सायंकाळी ६ वाजता, अभिषेकची आई रेखाबाई घरात स्वयंपाक करत असताना, माधवने अंगणात खेळणाऱ्या आपल्या पोटच्या मुलाचे अपहरण केले. त्याने चिमुरड्या अभिषेकला राहेर (ता. नायगाव) येथे नेऊन, एका पोत्यात बांधून गोदावरी नदीच्या पात्रात जिवंत फेकून दिले.
पाषाणहृदयी पित्याचे कृत्य उघड अभिषेक बेपत्ता झाल्याने सुरुवातीला कंधार पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तपासचक्र फिरवून माधव आणि त्याच्या नातेवाईकांकडे सखोल चौकशी केली असता, या क्रूर कृत्याचा उलगडा झाला. ३० मार्च २०२२ रोजी पोलिसांनी अभिषेकचा मृतदेह गोदावरीच्या पात्रातून शोधून काढला. एका निष्पाप जिवाचा आपल्याच पित्याकडून असा अंत झाल्याचे पाहून संपूर्ण परिसर हादरून गेला होता.
न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल कंधार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पडवळ आणि उप निरीक्षक इंद्राळे यांनी या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी वकील ॲड. महेश कागणे यांनी मांडलेला प्रभावी युक्तिवाद आणि पुराव्यांच्या आधारे सत्र न्यायाधीश एम. एन. पाटील यांनी आरोपीला दोषी ठरवले.
न्यायालयाने आरोपी माधव देव्हारे याला खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे:
- कलम ३०२ (खून): जन्मठेप आणि १००० रुपये दंड.
- कलम ३६४ (अपहरण करून खून करणे): जन्मठेप आणि १००० रुपये दंड.
- कलम २०१ (पुरावा नष्ट करणे): ५ वर्षे सक्तमजुरी आणि १००० रुपये दंड.
- सर्व शिक्षा माधव देव्हारेला एकत्रित भोगायच्या आहेत
या खटल्यात पोलीस पैरवी सहायक पपोलीस उप निरीक्षक संजय मुंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. पोटच्या गोळ्याचा काळ बनणाऱ्या या नराधम पित्याला मिळालेल्या या शिक्षेमुळे समाजात एक कठोर संदेश गेला आहे. एका माऊलीने आपल्या पोटच्या मुलाला गमावले आणि जन्मदात्यानेच त्याचे रक्षण करण्याऐवजी भक्षण केले, या विचाराने आजही नारनाळी गाव सुन्न आहे.
Post Views: 423
