अष्टविनायक मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे महिनाभर बंद:जतन आणि संवर्धन कामासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
![]()
अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांच्या जतन व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. कामाचा वेग आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता, श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक ही तीन मंदिरे १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून श्री मयुरेश्वर मंदिर (मोरगाव), श्री चिंतामणी मंदिर (थेऊर) आणि श्री सिद्धिविनायक मंदिर (सिद्धटेक) येथे दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक काळातील मूळ दगडी बांधकाम पुन्हा सुबक स्वरूपात आणण्यासाठी हे संवर्धन कार्य केले जात आहे. हे दगडी बांधकामाचे काम अत्यंत किचकट आणि संवेदनशील असल्याने, कामाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी अडथळा ठरू शकते. पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी या संदर्भात पुणे विभागाच्या सह धर्मादाय आयुक्तांकडे मंदिरे बंद ठेवण्याची विनंती केली होती. पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर, सह धर्मादाय आयुक्तांनी ७ मे रोजी हे आदेश निर्गमित केले. या निर्णयाची माहिती देण्यासाठी ८ मे रोजी तिन्ही गावांमध्ये ग्रामसभांचेही आयोजन करण्यात आले आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, १० मे पासून पुढील एक महिना भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश मिळणार नाही. तथापि, मंदिरातील परंपरेनुसार होणारी श्रींची नित्य पूजा, अर्चा आणि इतर धार्मिक विधी नियमाप्रमाणे सुरू राहतील. मंदिर परिसरात केवळ पुजारी, बांधकाम यंत्रणेचे कर्मचारी, अधिकृत अधिकारी आणि विश्वस्त यांनाच प्रवेश दिला जाईल. “अष्टविनायक मंदिरांचे हे जतन आणि संवर्धन कार्य दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक आहे. हे काम वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी भाविकांनी आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे,” असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त श्री मंदार महाराज देव व इतर विश्वस्तांनी केले आहे. या कालावधीत भाविकांनी आपली यात्रा नियोजित करताना या बदलाची नोंद घ्यावी, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
