![]()
नागपूर पोलिसांनी स्वतःला मोठे पोलिस अधिकारी आणि पत्रकार सांगत पोलिस ठाण्यात धिंगाणा घालणाऱ्या चार तोतयांना अटक केली आहे. या आरोपींनी थेट पोलिसांनाच ‘गोळ्या घालून उडवून टाकू’ अशी धमकी दिली, ज्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. गौरव हरिप्रसाद पांडे (वय 31), सचिन सुरेशसिंह बैस (वय 42), नरेंद्र लल्लूजी चौबे (वय 57) आणि जितेंद्र अशोककुमार कुंदवाणी (वय 42) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे चारही तोतया आरोपी एका पोलिस ठाण्यात घुसले. त्यांनी तेथील पोलिस कर्मचाऱ्यांशी अरेरावी करत आपण मोठे पत्रकार आणि पोलिस अधिकारी असल्याचे भासवले. तसेच, पोलिसांना त्यांची वर्दी उतरवण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही मवाळ भूमिका न घेता नवीन भारतीय न्याय संहितेच्या कडक कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. तोतयागिरी करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या आरोपांखाली कलम 204, 329, 296, 351 (3) आणि 3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तोतया टोळीचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्यांनी यापूर्वी अशाच प्रकारे कोणाला धमकावले आहे का, याचा तपास आता पोलिस करत आहेत.
नागपुरात तोतया पोलिस-पत्रकारांना अटक:पोलिस ठाण्यात 'गोळ्या घालून उडवून टाकू' म्हणत केला ड्रामा; पोलिसांना दिली धमकी
