कोरेगाव पार्क पोलीस हवालदार दीड लाखांची लाच घेताना अटक:अजामीनपात्र वॉरंट टाळण्यासाठी एसीबीने केली कारवाई
![]()
कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. अजामीनपात्र वॉरंट बजावू नये आणि संबंधित व्यक्तीला अटक टाळण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गणेश शहाजी कस्पटे (वय ४०, पोलीस हवालदार, बक्कल नंबर २७८१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका ५२ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार ज्या कंपनीत काम करतात, त्या कंपनीच्या मालकाविरुद्ध हैदराबाद येथील न्यायालयात चेक बाऊन्सची केस सुरू आहे. या प्रकरणात न्यायालयाने मालकाविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. हे वॉरंट बजावण्याची जबाबदारी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्याचे हवालदार गणेश कस्पटे यांच्याकडे होती. वॉरंट बजावू नये आणि मालकाला अटक होऊ नये यासाठी मदत करण्याच्या बदल्यात कस्पटे याने यापूर्वी ७ मार्च २०२६ रोजी ५ लाख रुपये घेतले होते. त्यानंतर, १ मे २०२६ रोजी त्याने पुन्हा तक्रारदाराशी संपर्क साधला आणि वॉरंट प्रलंबित असल्याचे सांगून मालकाला अटक न करण्यासाठी अडीच लाख रुपयांची मागणी केली. लाचेची मागणी वारंवार होत असल्याने तक्रारदाराने पुणे एसीबीकडे धाव घेतली. ५ मे २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने पंचासमक्ष या मागणीची पडताळणी केली. तडजोडीनंतर लाचेची एकूण रक्कम २ लाख रुपये निश्चित करण्यात आली, ज्यातील १ लाख ५० हजार रुपयांचा पहिला हप्ता ६ मे रोजी देण्याचे ठरले. मंगळवारी बोट क्लब रोडवरील ‘सुलक्स कल्पतरू गार्डन सोसायटी’समोर एसीबीने सापळा रचला. ठरल्याप्रमाणे हवालदार कस्पटे तिथे आला आणि त्याने तक्रारदाराकडून दीड लाख रुपये स्वीकारले. लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला घेराव घातला. यावेळी आरोपी कस्पटेने स्वतःला वाचवण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्याने तक्रारदाराला धक्काबुक्की केली, सरकारी कामात अडथळा निर्माण करून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने तक्रारदाराला चावा घेतला आणि पोलिसांनाही धक्काबुक्की केली. मात्र, पथकातील सदस्यांनी त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. आरोपी गणेश कस्पटेविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ चे कलम ७ आणि भारतीय न्याय संहिता कलम १३२, ११५(२) नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
