आता टोल नाक्यावर मिळणार ताजी भाजी:राज्यभरात उभारले जाणार 'कृषी मॉल'; सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय
![]()
राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने एक अभिनव योजना आखली आहे. राज्यातील सर्व प्रमुख रस्ते आणि महामार्गांवरील टोल नाक्यांच्या परिसरात आता सुसज्ज ‘कृषी मॉल’ उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी लांबच्या बाजारपेठांवर अवलंबून राहावे लागणार नाही, तर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना थेट शेतातून आलेली ताजी फळे आणि भाजीपाला खरेदी करता येणार आहे. अनेकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती किंवा शहरांमधील बाजारपेठेत नेण्यासाठी मोठा वाहतूक खर्च करावा लागतो. तसेच प्रवासात बराच वेळ आणि श्रम वाया जातात. आता टोल नाक्यांवरच विक्रीची सोय उपलब्ध झाल्याने, शेताच्या जवळच हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च शून्यावर येईल आणि नफ्यात वाढ होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ग्राहकांसाठी ‘स्वस्त आणि मस्त’ खरेदी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा दर्जेदार आणि ताजी फळे किंवा भाजीपाला मिळत नाही. मात्र, या कृषी मॉल्समुळे प्रवाशांना मध्यस्थांशिवाय थेट शेतकऱ्यांकडून माल घेता येईल. कोणत्याही मध्यस्थाचा हस्तक्षेप नसल्यामुळे बाजारपेठेच्या तुलनेत येथे शेतमाल स्वस्त दरात मिळण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशालाही दिलासा मिळणार आहे. आठवडी बाजारानंतरचे मोठे पाऊल यापूर्वी राज्यात शहरांमध्ये ‘थेट शेतकरी ते ग्राहक’ हा आठवडी बाजाराचा प्रयोग यशस्वी झाला होता. त्याच धर्तीवर आता महामार्गावरील ही नवीन बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी क्रांतीकारी ठरू शकते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मॉल्सच्या बांधकामासाठी हालचाली सुरू केल्या असून, लवकरच प्रत्येक टोल नाक्यावर ही सुविधा कार्यान्वित केली जाणार आहे. हे ही वाचा… महिनाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार:पीक नुकसानीची भरपाईही मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्त्वाची माहिती “राज्यातील कर्जमाफीबाबतच्या सर्व माहितीचे संकलन पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या एक महिन्याच्या आत यावर अंतिम निर्णय घेतील,” अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली आहे. या अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे २ लाखांपर्यंतचे थकबाकीदार शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ होणार असून, नियमित कर्जदारांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. सविस्तर वाचा…
