पुण्यात भीषण अपघात, एकाचा मृत्यू:मुंबई-बंगळुरू महामार्गावर पिकअपला कंटेनरची धडक, एक गंभीर जखमी
![]()
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे परिसरात सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनरने पिकअप व्हॅनला धडक दिल्याने २२ वर्षीय चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी सकाळी ८:०५ वाजताच्या सुमारास मुंबई-बंगळुरू महामार्गावर मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हॉटेल पिगारासमोर घडला. टाटा आयशर कंटेनर (एम एच 04 एम एच 6303) चालक इम्रान अब्दुल जमादार याने निष्काळजीपणे वाहन चालवून समोर असलेल्या पिकअप (एम एच 42 ए क्यू 6142) ला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, पिकअप पुढील दुसऱ्या एका टाटा आयशर वाहनावर (एम एच 46 डी सी 3799) जाऊन आदळली. या अपघातात पिकअप चालक महादेव उत्तम शेंडे (वय २२) यांचा जागीच मृत्यू झाला. याच अपघातात सुमित दत्तू कांबळे (वय २२, रा. कवक्युटे, ता. इंदापूर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ सिंहगड रस्त्यावरील मोरया हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.अतिदक्षता विभागात जखमींवर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच नऱ्हे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम शेटे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातग्रस्त तिन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक तातडीने सुरळीत केली. याप्रकरणी जखमी तरुणाच्या फिर्यादीवरून निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या कंटेनर चालकावर कायदेशीर कारवाई केली जात आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त संभाजी पाटील यांनी दिली.
