तांबडा-पांढरा रस्सा, सावजी मटण अन झुणका-भाकर:'महालक्ष्मी सरस'मध्ये महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा दरवळ; 250 रुपयांपासून थाळी
![]()
उमेद अभियानाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अनेक महिला आर्थिक दृष्ट्या सशक्त झाल्या आहेत. महालक्ष्मी सरस २०२६ मध्ये महिला उद्योजकांनी हस्तकला आणि उत्पादनांसोबतच महाराष्ट्राच्या अस्सल खाद्यसंस्कृतीची समृद्ध मेजवानी खवय्यांचे विशेष आकर्षण ठरत आहे. येथे तयार होणारे सर्व पदार्थ ताजे आणि पारंपरिक पद्धतीने हाताने बनवलेले आहेत. प्रत्येक स्टॉलवर त्या-त्या जिल्ह्याची खासियत, चव आणि संस्कृती अनुभवायला मिळत असून, खवय्यांसाठी ही एक वेगळीच पर्वणी ठरत आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, ठाणे, सिंधुदुर्ग, हिंगोली, गोंदिया, बुलढाणा, यवतमाळ, बीड, जालना अशा विविध जिल्ह्यांतून आलेल्या महिला उद्योजकांनी आपल्या गावची अस्सल गावरान चव येथे आणली आहे. नॉनव्हेज प्रेमींसाठी आकर्षण कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, भंडाऱ्याचा खर्डा मटण, सावजी कलेजी, सावजी मुंडी-पाया, बुलढाण्याचे वराडी चिकन, बीडचे सावजी मटण, मराठवाडा स्पेशल चिकन कंटकी, मच्छी फ्राय यांसारखे पदार्थ मोठ्या प्रमाणात पसंतीस उतरत आहेत. यवतमाळ स्पेशल खेकडा थाळी आणि बटेर थाळी हेही खवय्यांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. कोकणातून आलेल्या स्टॉल्सवर सुरमई, पापलेट यांसारख्या माशांच्या थाळ्यांनाही मोठी मागणी आहे. विविधतेने नटलेले व्हेज पदार्थ अहिल्यानगरचे वांग्याचे भरीत, कोथिंबीर भाकरी, नंदुरबारची झुणका-भाकर, अकोल्याची मुगाची उसळ, चंद्रपूरची पुरणपोळी, धुळे स्पेशल शेवभाजी ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. विदर्भ स्पेशल थाळीत खवा पोळी, रोडगे, बासुंदी, मांडे, पातोडी भाजी, वारंगा खिचडी असे पारंपरिक पदार्थ मिळत आहेत. पुणे स्पेशल शेवग्याची भाजी, मांडे आणि पातोडी हेही खास आकर्षण ठरत आहेत. याशिवाय कोल्हापुरी मिसळ, थालीपीठ, खपली गव्हाची खीर, भिगवण स्पेशल मच्छी थाळी यांनाही ग्राहकांची पसंती मिळाली आहे. गोड पदार्थांमध्ये उकडीचे मोदक, खव्याची पोळी तर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे आईस्क्रीमही उपलब्ध आहे. बजेटमध्ये मेजवानी येथे मिळणाऱ्या थाळींची सुरुवात केवळ २५० रुपयांपासून होत असून, प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसणारी ही खाद्य मेजवानी ठरत आहे. पारंपरिक पद्धती, घरगुती चव आणि महिलांच्या हस्तकौशल्यामुळे या पदार्थांना वेगळीच ओळख मिळाली आहे. महालक्ष्मी सरस २०२६ हा उपक्रम केवळ विक्री-प्रदर्शनापुरता मर्यादित नसून, महिलांच्या उद्योजकतेला चालना देत त्यांच्या कलेला, परंपरेला आणि चवीला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे.
