पैशांनी विकत घेता येणारे कार्यकर्ते आम्ही नाहीत:पक्षांतराच्या चर्चांदरम्यान खासदार संजय जाधवांची प्रतिक्रिया, संजय राऊतांबद्दलही मोठं वक्तव्य




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चांमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना परभणीचे खासदार संजय हरिभाऊ जाधव यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगतानाच कार्यकर्ते पैशांनी विकत घेता येत नाहीत, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी म्हटले. “माझे कार्यकर्ते मनापासून साथ देणारे” परभणीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय जाधव म्हणाले, “माझं माझ्या कार्यकर्त्यांवर प्रेम आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. हे पैशांनी विकत घेता येणारे लोक नाहीत. ते मनापासून माझी काळजी घेणारे आणि माझ्या पाठीशी उभे राहणारे कार्यकर्ते आहेत.” तसेच, “मी घेतलेल्या निर्णयाचे आणि भूमिकेचे समर्थन करतो. जनतेने मला समाजाच्या कल्याणासाठी आणि विकासकामांसाठी निवडून दिले आहे. त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी काम करत राहणार आहे,” असेही त्यांनी सांगितले. पक्षांतराच्या चर्चांमध्ये जाधवांच्या भूमिकेकडे लक्ष गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. काही खासदारांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारल्यानंतर उर्वरित खासदारांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत संजय जाधव यांनी कार्यकर्त्यांवरील विश्वास व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केल्याचे मानले जात आहे. संजय राऊतांबद्दल काय म्हणाले? यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबद्दलही भाष्य केले. “संजय राऊत हे अत्यंत ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. देशभरातील अनेक लोक त्यांचे कौतुक करतात, तर काही जण त्यांच्यावर टीकाही करतात,” असे जाधव म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी, “संजय राऊत यांची विचारसरणी वेगळ्या पातळीची आहे. ते एक उत्कृष्ट लेखक आहेत,” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले. ठाकरे गटासाठी महत्त्वाचा संदेश? राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडी, खासदारांच्या पक्षांतराच्या चर्चा आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर संजय जाधव यांची ही प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जात आहे. कार्यकर्त्यांशी असलेले नाते आणि आपण घेतलेल्या भूमिकेवर ठाम असल्याचा संदेश त्यांनी दिल्याने ठाकरे गटासाठी हा दिलासादायक संकेत मानला जात आहे. “हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी”; श्रीकांत शिंदेंचं सूचक विधान शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना श्रीकांत शिंदे यांनी “हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे,” असे म्हणत आगामी काळात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत दिले. “गेली चार वर्षे आम्ही राजकीय धक्केच देत आहोत” प्रसारमाध्यमांशी बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले, “स्फोटावर स्फोट होतच राहतील. गेली चार वर्षे आम्ही फक्त राजकीय धक्केच देत आलो आहोत. ‘ये तो बस ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’.” त्यांच्या या वक्तव्यानंतर महायुती आणि विरोधी पक्षांच्या राजकारणात आणखी कोणते बदल होणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. संबंधित बातमी वाचा…, 2022 ला चौकार मारला, आता थेट ‘सिक्सर’:हे ऑपरेशन टायगर फुलप्रूफ अन् सक्सेसफुल! एकनाथ शिंदेंची तुफान फटकेबाजी
“आम्ही कोणतेही ‘ऑपरेशन’ अर्धवट सोडत नाही, तर ते ‘फुलप्रूफ’ करतो. 2022 मध्ये आम्ही जेव्हा उठाव केला, तेव्हा चाळीस आमदारांचा चौकार मारला होता आणि आता थेट 6 खासदारांचा षटकार (सिक्सर) मारला आहे,” अशी तुफान फटकेबाजी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का दिला. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आयोजित एका भव्य कार्यक्रमात ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांनी अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ‘शिवसेनेत’ प्रवेश केला. या प्रवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी आपले सविस्तर मनोगत व्यक्त केले. येथे वाचा सविस्तर…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *