नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा:'शीरखूर्मा'तून गुंगीचे औषध देऊन पीडितांचे लैंगिक शोषण?; तपास यंत्रणांचा संशय
![]()
नाशिक येथील नामांकित आयटी कंपनी ‘टीसीएस’मधील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतर करण्याच्या प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणाच्या तपासात आता एक अत्यंत खळबळजनक माहिती समोर आली असून, पीडित तरुणींना ‘शीरखुर्मा’ सारख्या गोड पदार्थातून गुंगीचे औषध देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा दाट संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित आणि अद्याप फरार असलेली आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळून लावला असून, अटकेतील चार आरोपींची रवानगी ५ मे पर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष पथकाला (SIT) आता ‘ड्रग्ज’ आणि मादक पदार्थांचा नवा अँगल मिळाला आहे. प्राथमिक तपासानुसार, आरोपींनी आधी महिला कर्मचाऱ्यांशी मैत्री वाढवली आणि त्यानंतर त्यांना शीरखुर्मा खायला दिला. या पदार्थांमध्ये गुंगी आणणारे आणि कामोत्तेजक पदार्थ मिसळले गेल्याचा संशय आहे. याच अमली पदार्थांच्या प्रभावाखाली महिलांवर अत्याचार करण्यात आले. आता नाशिक पोलीस या दिशेने सखोल तपास करत असून, कोठडीत असलेल्या आरोपींनी यापूर्वी अशा किती महिलांना लक्ष्य केले आहे, याची माहिती घेतली जात आहे. दहशतवाद्यांशी कनेक्शन आणि ‘फंडिंग’चे पुरावे हा प्रकार केवळ वैयक्तिक गुन्हेगारी नसून यामागे एक मोठे आंतरराष्ट्रीय आणि धार्मिक षडयंत्र असल्याचे पुरावे मिळत आहेत. विशेष तपास पथकाने (SIT) आरोपींचे बँक स्टेटमेंट आणि ‘केवायसी’ (KYC) कागदपत्रे तपासली असता, तरुणींच्या धर्मांतरासाठी काही संशयास्पद ‘फंडिंग’ (निधी) झाल्याचे ठोस पुरावे हाती लागले आहेत. या रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे आणि या फंडिंगचा मूळ स्रोत काय आहे, याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींचे थेट दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचेही धागेदोरे तपास यंत्रणांना मिळत आहेत. फरार ‘निदा खान’ला न्यायालयाचा दणका मुख्य संशयित आरोपी निदा एजाज खान हिने अटकपूर्व जामिनासाठी नाशिकरोड येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात मांडलेला प्रभावी युक्तिवाद आणि पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. निदा सध्या फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. इतर आरोपी दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांची पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे. आरोपींची विकृत मानसिकता आणि ग्रुपवरील चॅटिंग तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईलमधील ‘चॅटिंग’मधून अनेक विकृत गोष्टी समोर आल्या आहेत. हे आरोपी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये हिंदू देवी-देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करत असत आणि कंपनीच्या अंतर्गत ग्रुपवर महिला कर्मचाऱ्यांबद्दल अश्लील शेरेबाजी करत असत. कंपनीने दिलेल्या धार्मिक सवलतींचा गैरफायदा घेऊन त्यांनी हे धर्मांतराचे रॅकेट चालवल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत निदा खान, दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ अन्सारी आणि अश्विनी चैनानी यांची नावे समोर आली आहेत. ५ मे पर्यंतच्या कोठडीत हे आरोपी आणखी कोणती गुपिते उघड करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
