अर्जुननगरमध्ये डिपी पेटल्यामुळे नागरिकांनी रात्र काढली अंधारात:शहरातील पूर्वा टाऊनशिप, पटवारी कॉलनीतील वीजपुरवठा ११ तास ठप्प‎

0
240_177773276469f60c9c76ff7_img_20260502_02.jpg




प्रतिनिधी । अमरावती शहरातील अर्जुननगर परिसरात महावितरणच्या निष्काळजीपणाचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे. पुर्वा टाऊनशिप आणि पटवारी कॉलनीला वीजपुरवठा करणारी डिपी शुक्रवारी १ मे रोजी मध्यरात्री सुमारास अक्षरशः पेटल्याने परिसरात खळबळ उडाली. या भीषण घटनेत चार मुख्य केबल जळून खाक झाले असून, शेकडो नागरिकांना असह्य उकाड्यात रात्र काढावी लागली. शनिवारी दुपारी साडेबारा वाजता म्हणजेच अकरा तासानंतर वीजपुरवठा सुरू झाला होता. उन्हाळ्याच्या कडाक्यात आधीच हैराण झालेल्या नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम या घटनेने केले. वीजपुरवठा खंडित झाल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या मते, संबंधित डिपीवर प्रचंड ताण आहे. सद्यास्थितीत दररोज किंवा एक दिवसाआड रात्री ११ ते १ या वेळेत किमान एक ते दोन वेळा वीज खंडित होणे, ही या भागातील नित्याची बाब बनली आहे. विशेष म्हणजे, या डिपीमध्ये मूलभूत सुरक्षाव्यवस्था देखील सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे समोर आले आहे. किटकॅट नसताना फ्युज टाकताना होणारे प्रचंड स्पार्किंग ही मोठ्या दुर्घटनेची घंटा होती. मात्र तरीही महावितरण प्रशासनाने याकडे दुर्लक्षच केले, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *