Maharashtra Census 2027 Begins; Commissioner Pulkundwar Appeals Self-Counting
![]()
देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या जनगणना २०२७ प्रक्रियेला आजपासून औपचारिक सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईन पद्धतीने आपली ‘स्व-गणना’ पूर्ण केली.
.
यावेळी विभागीय आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले की, देशाच्या नियोजनासाठी आवश्यक असलेली माहिती अचूक भरावी आणि जनकल्याणासाठी असलेल्या या जनगणनेत सक्रिय सहभाग नोंदवावा.
डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले की, जनगणना २०२७ चा पहिला टप्पा ‘स्व-गणना’ १ ते १५ मे २०२६ या कालावधीत राबवला जात आहे. यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष ‘घरगणना’ केली जाईल. या टप्प्यात प्रगणक प्रत्येक कुटुंबाची माहिती संकलित करण्यासाठी गृहभेटी देतील, तेव्हा त्यांना सहकार्य करावे.
केंद्र शासनाने जनगणना २०२७ साठी https://se.census.gov.in/ हे संकेतस्थळ उपलब्ध करून दिले आहे. नागरिकांनी या संकेतस्थळावर आपल्या कुटुंबाशी संबंधित अचूक माहिती भरावी आणि माहिती भरल्यानंतर ती पुन्हा एकदा तपासूनच ऑनलाईन सादर करावी, असे आवाहन डॉ. पुलकुंडवार यांनी केले.
यावेळी पुणे शहर तहसीलदार स्मिता माने आणि पुणे छावणी परिषदेचे सहायक जनगणना अधिकारी शकील मुजावर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे यांचा स्वगणनेतून जनगणना २०२७ मोहिमेला शुभारंभ
जनगणना २०२७ या महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमाची महाराष्ट्रात आजपासून सुरुवात झाली असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवि लांडगे यांनी स्वतः ऑनलाइन स्वगणना पूर्ण करून या मोहिमेचा प्रारंभ केला. नागरिकांनीही पुढाकार घेत या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
महापौर रवि लांडगे यांनी https://se.census.gov.in या संकेतस्थळावर भेट देत आवश्यक माहिती भरून स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली. सर्व ३४ प्रश्नांची अचूक माहिती देत त्यांनी नोंदणी केली आणि ‘सेल्फ एन्युमरेशन आयडी’ प्राप्त केला. त्यांच्या या कृतीमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचला आहे.
महापौर लांडगे म्हणाले, जनगणना ही देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यावश्यक आहे. अचूक माहितीमुळे शासनाला योग्य नियोजन करता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने या उपक्रमात सहभागी व्हावे. १ मे ते १५ मे २०२७ या कालावधीत स्वगणना सुविधा उपलब्ध असून नागरिकांना घरबसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. याशिवाय, १६ मे ते १४ जून दरम्यान प्रगणकांमार्फत घरोघरी भेट देऊन उर्वरित जनगणना प्रक्रिया पार पडणार आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी स्वगणना करून सहकार्य करावे, असे आवाहन महापौर लांडगे यांनी केले आहे.
