मावळमध्ये धरण, नदीत बुडून 4 पर्यटकांचा मृत्यू:महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त घडली घटना
![]()
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या सुट्टीनिमित्त पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चार पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. जाधववाडी धरण आणि पवना नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या या तरुणांवर काळाने घाला घातला. या दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण मावळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहिली हृदयद्रावक घटना नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरण परिसरात घडली. अजय गारुडे, संतोष एडके आणि अनिकेत पवार यांच्यासह एकूण पाच जण धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन दोघांना सुखरूप बाहेर काढले, मात्र अजय, संतोष आणि अनिकेत यांचा बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तिघांना बाहेर काढले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु तो निष्फळ ठरला. दुसरी घटना साळुंब्रे गावाजवळील पवना नदीच्या जुन्या दगडी पुलाजवळ घडली. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ उत्तर प्रदेश) हा तरुण सकाळी ८ च्या सुमारास पोहण्यासाठी नदीत उतरला होता. मनोज हा स्थानिक काळोखे पाईप लाईन कंपनीत कामाला होता. पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गेला आणि बुडाला. या दोन्ही घटनांची माहिती मिळताच ‘वन्यजीव रक्षक मावळ संस्था’, ‘शिवदुर्ग मित्र लोणावळा’ आणि ‘एनडीआरएफ’ च्या पथकांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, कमल परदेशी, शुभम काकडे, विकास दोड्डी, भारत मेहेंदळे, कमलेश राक्षे, सर्जेस पाटील, विकी दौंडकर, अविनाश कार्ले, रवी कोळी, कुंदन भोसले, हर्षद काळोखे, राजू सय्यद आणि करण भांगरे या सदस्यांनी अथक परिश्रम घेऊन मृतदेह बाहेर काढले. जाधववाडी येथील तिघांचे मृतदेह ‘विरा ॲम्बुलन्स’च्या मदतीने तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले, तर साळुंब्रे येथील तरुणाला पवना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
