1.40 कोटींची ऑनलाईन फसवणूक:पुणे सायबर पोलिसांकडून सातारा येथून एकाला अटक
![]()
शेअर ट्रेडिंगमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १ कोटी ४० लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी पुणे शहर सायबर पोलिसांनी एका आरोपीला सातारा येथून अटक केली आहे. सुशांत हनमंत निकम (वय ३८, रा. अपशिंगे, ता. जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणात, आरोपींनी फिर्यादीशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला होता. त्यांना ‘तायकुन कॉईन कंपनी’ मार्फत ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले. या प्रलोभनाला बळी पडून फिर्यादीने विविध बँक खात्यांमध्ये एकूण १ कोटी ४० लाख १६ हजार ३१५ रुपये जमा केले. मात्र, त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आयटी ॲक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळवली की, फसवणुकीच्या रकमेपैकी १ लाख रुपये साताऱ्यातील सुशांत निकम याच्या आयडीबीआय बँक खात्यावर जमा झाले होते. या माहितीच्या आधारे, सायबर पोलीस स्टेशनच्या पथकाने तात्काळ सातारा येथे जाऊन सापळा रचला आणि निकमला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणातील इतर आरोपींचा शोध घेत आहेत. ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) विवेक मासाळ, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शुभादा संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुशील डुमरे आणि त्यांच्या पथकातील संदेश कर्णे, प्रवीणसिंह राजपूत, राजुदास चव्हाण, अमर बनसोडे, सतीश मांढरे, शितल डांगे, अनिकेग भिंगारे व सचिन शिंदे यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली. सायबर पोलिसांनी नागरिकांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शेअर ट्रेडिंगमध्ये जास्त परताव्याचे आमिष, कुरिअर पार्सलमध्ये ड्रग्ज असल्याचे सांगून अटकेची भीती दाखवणे, वीज किंवा गॅस कनेक्शन कापण्याची धमकी देणे किंवा बँक केवायसी अपडेटच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहावे. असे संशयास्पद प्रकार घडल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
