ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा सरकारला इशारा:शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-05-01t211120903_1777650114.jpg




शेतकऱ्यांसह नागरिकांची मागणी नसताना शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास शासन का करीत आहे असा सवाल करीत सदर महामार्ग रद्द करण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करू असा इशारा ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शुक्रवारी ता एक सरकारला दिला आहे. पत्रादेवी ते पवनार हा शक्तीपीठ महामार्ग हिंगोली जिल्ह्यातून जात आहे. मात्र या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन गमवावे लागणार आहे. यामुळे या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज पालकमंत्री नरहरी झिरवळ तसेच खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची भेट घेऊन महामार्ग रद्द करण्याची मागणी केली. त्यानंतर बोलताना खासदार नागेश पाटील आष्टीकर म्हणाले की शक्तीपीठ महामार्ग करण्याची कुठलीही मागणी नसताना शासन कशाच्या आधारावर हा महामार्ग करत आहे हे कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे एका भागातून विरोध झाल्यानंतर शासन दुसऱ्या भागातून रस्ता तयार करण्याच्या हालचाली करत आहे. मात्र सरकारचा हा अट्टाहास कशासाठी, सरकारला कोणाच्या खिशात पैसे टाकायचे आहेत असाही त्यांनी सवाल केला आहे. एकीकडे ग्रामीण भागातून रस्ते नादुरुस्त झाले आहेत. ग्रामीण रस्त्यांवर खड्ड्यांमुळे दररोजच अपघात होत आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती करणे अपेक्षित असताना शासन त्यासाठी निधी देत नाही. मात्र शक्तीपीठ महामार्गावर करोडो रुपयांचा निधी कशासाठी खर्च करत आहे. शासनाकडे निधी नसल्याचे सांगत ग्रामीण रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एका आमदाराला 25 कोटी रुपयांचा तुटपुंजा निधी दिला जात आहे तर दुसरीकडे शक्तीपीठ साठी करोडो रुपये आले कुठून असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता कुठल्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही अशी आपली भूमिका आहे. शेतकरी व आमची भूमिका पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडावी अशी विनंती ही पालकमंत्र्यांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी उभे केलेल्या आंदोलनाला आपला पाठिंबा असून कुठल्याही स्तराला जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन शक्तिपीठ महामार्गाचा नाद करू नये असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दरम्यान शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याच्या प्रकारावरूनही खासदार आष्टीकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यापुढे गुन्हे दाखल केले जाऊ नये अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *