मुकुंदनगरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; गॅस सिलिंडरचे स्फोट:दोन दुकाने, घर जळून खाक; नागरिकांमुळे जीवितहानी टळली




छत्रपती संभाजीनगर येथील बाळापूर रोडवरील मुकुंदनगर भागात सोमवारी (२२ जून) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एका भंगार आणि कापडाच्या दुकानाला भीषण आग लागली. शेतकरी दूध डेअरीजवळ घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. आगीमुळे दुकानातील गॅस सिलिंडरचे मोठे स्फोट झाले, ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. या आगीने रौद्ररूप धारण केल्याने दोन्ही दुकाने पूर्णपणे भस्मसात झाली. दुकानांच्या अगदी पाठीमागे भाड्याने राहणारे योसेफ घोरपडे आणि त्यांच्या वृद्ध आई-वडिलांचे घरही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीच्या ज्वाळा घरात शिरल्याने घोरपडे कुटुंबाचे सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून, त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील नागरिकांनी तात्काळ धावपळ करत आग विझवण्यासाठी पुढाकार घेतला. किशोर जीतकर, विशाल जैस्वाल, ईदगे पाटील बंधू, विठ्ठल डाखोरकर, सुभाष जाधव, आदित्य डाखोरकर, सचिन सूर्यवंशी, अमर आणि रोहन आव्हाड, रोहित राजपूत यांच्यासह अनेक तरुणांनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांच्या मदतीने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. नागरिकांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे पुढील मोठा अनर्थ आणि जीवितहानी टळली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *