![]()
देशातील आठवे ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या औंढा नागनाथ येथील मंदिराचा लवकरच कायापालट होणार आहे. सोमवारी २२ जून रोजी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंदिर परिसराच्या विकासासाठी १८२ कोटी रुपयांच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ेय मंदिर परिसरासाठी १०६ कोटी तर पुरातत्व विभागाच्या ७६ कोटींच्या कामांचाही समावेश आहे. देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे दरवर्षी महाशिवरात्री निमित्त मोठी यात्रा भरते. या यात्रा कालावधीत रथोत्सव कार्यक्रम भाविकांचे मुख्य आकर्षण असते. या शिवाय श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी होत असून नागपंचमीच्या दिवशीही भाविक येतात. संपूर्ण देशभरातील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. मात्र त्या तुलनेत या ठिकाणी भाविकांना पुरेशी व्यवस्था नाही. त्यामुळे या ठिकाणी आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वेळोवेळी करण्यात आली होती. दरम्यान, मंदिर व परिसराच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने सुरवातीला २६६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर सुधारित आराखडा तयार करण्याच्या सूूचना दिल्यानंतर ४४५ कोटींचा आराखडा तयार झाला. त्यानंतरही उच्चाधिकार समितीने त्यात काही दुरुस्ती सुचवून नव्याने आराखडा प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पुढाकार घेऊन नियोजन विभागामार्फत मंदिर परिसराच्या विकास कामांसाठी १०६ कोटी तर पुरातत्व विभागा्च्या कामांसाठी ७६ कोटींच्या आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार आज मुख्य सचिवांच्या उपस्थितीत उच्चाधिकार समितीची बैठक झाली. यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी गंगाधर चितळे यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता यांनी आराखडा सादर करून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उच्चाधिकार समितीने या आराखड्याला मान्यता दिली आहे. त्यानंतर आता सदर आराखडा शिखर समितीच्या बैठकीत ठेवला जाणार आहे. शिखर समितीच्या बैठकीत मान्यता मिळाल्यानंतर कामे सुरु करण्याबाबत आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे. मंदिर परिसरात होणार कामे आधुनिक दर्शन मंडप, कार्यालय, पास केंद्र यासाठी १४.१८ कोटी रुपये, मंदिर परिसरात दगडी फरशी बसवणे १५.०६ कोटी रुपये. मुख्य प्रवेश मार्गापासून मंदिर प्रकारापर्यंत आणि नागनाथ कुंडाकडे जाणाऱ्या दर्शनबारीसाठी १०.१६ कोटी, तर उत्तरे कडील व्हीआयपी दर्शनबारीसाठी ४.८९ कोटी रुपये, मंदिराच्या सुरक्षेसाठी सुरक्षा भिंत उभारणीसाठी २.६० कोटी रुपये अग्निसुरक्षा व्यवस्थापनासाठी २.७५ कोटी रुपये, मुख्य प्रवेशद्वार आणि सुरक्षा केबिनसाठी १.०५ कोटी, तर पोलीस व माहिती बुथसाठी २.६३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या शिवाय इतर आवश्यक बाबी उभारल्या जाणार आहेत.
औंढा नागनाथ परिसराचा होणार कायापालट:182 कोटींच्या आराखड्याला उच्चाधिकार समितीची मान्यता, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचा पुढाकार
