[ads1]
नांदेड (प्रतिनिधी)- विष्णूनगर परिसरातील 26 नंबर रोडवरील मंगळवारी (दि. 1 सप्टेंबर) सकाळी दहाच्या सुमारास स्कुटीवरून कॉलेजला जाणार्या 20 वर्षीय विद्यार्थिनीला रेल्वेच्या मालवाहू चार चाकी गाडीची धडक बसून तिचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. मानसी संजय जाधव असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मानसी जाधव ही नांदेड येथील लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. शिक्षणासोबतच ती एका खासगी फायनान्स कंपनीत नोकरीही करत होती. मंगळवारी सकाळी ती स्कुटीवरून कॉलेजला जात असताना रमामाता आंबेडकर चौक परिसरात हा अपघात झाला. रेल्वेच्या मालवाहू चार चाकी गाडीची धडक बसल्याने मानसी खाली कोसळून गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी मानसीला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय, नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
मानसीच्या वडिलांचे सुमारे दहा वर्षांपूर्वी निधन झाले होते. तिच्या पश्चात आई, बहीण, भाऊ, आजी-आजोबा तसेच काका असा परिवार आहे. शिक्षण घेत असतानाच नोकरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावणार्या मानसीचा अचानक झालेला मृत्यू कुटुंबीयांसाठी मोठा धक्का ठरला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून घटनेची नोंद व पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली असून अपघाताच्या नेमक्या कारणाचा तपास करण्यात येत आहे.
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad