
डोंबिवली रेल्वे स्थानकावरील वाढत्या गर्दीचा आणि प्रवाशांच्या हालअपेष्टांचा मुद्दा मनसे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी थेट सोशल मीडियावर मांडत सरकारला जाब विचारला आहे. “डोंबिवली स्थानकावर रोजचाच हा गोंधळ आहे. सरकारला चाकरमान्यांचे हाल दिसत नाहीत
.
नेमके काय म्हणाले राजू पाटील?
राजू पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये डोंबिवली स्थानकाची गर्दी दाखवणारे व्हिडिओ शेअर करत लिहिले, आजचे डोंबिवली रेल्वे स्थानकावरचे हे चित्र ! हे रोजचेच आहे. राज्य सरकारला रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची जबाबदारी वाटते. फार फार एखादी दुर्घटना झाली की 5 लाखाचा चेक घेऊन सत्ताधारी कॅमेऱ्यासहीत तयारही असतात, पण कोणालाही मुंबईकडे जाणाऱ्या या चाकरमान्यांच्या रोजच्या व्यथा दिसत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
स्वायत्त रेल्वे बोर्डाची मागणी
निव्वळ टक्केवारी काढण्यासाठी पटापट होणारे मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यापेक्षा मुंबई लोकलचे महाराष्ट्राचे स्वायत्त रेल्वेबोर्ड स्थापन करून लोकलसेवा कशी सुधारता येईल यासाठी एक योजना हाती घेणे आवश्यक आहे, अशी मागणी राजू पाटील यांनी केली. उत्तरेकडून येणाऱ्या व उत्तरेकडे जाणाऱ्या काही बिनकामाच्या मेल-एक्सप्रेस मुंबई बाहेरून सोडल्यास लोकलच्या अधिक फेऱ्या वाढवता येतील. वंदे भारतला दिलेली प्राथमिकता या गोंधळात अधिक भर टाकत आहे अशाही तक्रारी प्रवासी करत असल्याचे ते म्हणाले.
राज्य व केंद्र सरकारकडे मागणी
या लोकलने प्रवास करणारे चाकरमनी मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत, त्यांची काळजी सरकारने घ्यायलाच हवी. आपण ज्या मुंबईच्या जीवावर देशभरात नंबर एकची जी टीमकी वाजवतो त्या मुंबईला संपन्न करण्यासाठी आपले जीव रोजच धोक्यात घालणाऱ्या प्रवाशांची जबाबदारी ही राज्य सरकारची पण आहे. सरकारने केंद्राकडे याबाबत पाठपुरावा करावा. सध्या दिल्लीत अधिवेशन सुरू आहे तिकडे जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पण याबाबत आवाज उठवावा, अशी मागणीही राजू पाटील यांनी केली आहे.
2024 मध्ये मुंबई लोकल ट्रेनमध्ये 2,282 मृत्यू
2025 मध्ये मुंबईच्या लोकल ट्रेन नेटवर्कमध्ये एकूण 2 हजार 282 लोकांचा मृत्यू झाला. हे मृत्यू रेल्वे रुळ ओलांडणे, खांबांना धडकणे, चालत्या गाड्यांमधून पडणे आणि प्लॅटफॉर्मच्या अंतरात अडकणे यासारख्या घटनांमुळे झाले. ही माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत दिली. काँग्रेस खासदार शशिकांत सेंथिल यांनी गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेशी संबंधित चिंता अधोरेखित करणाऱ्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती देण्यात आली.
गेल्या 10 वर्षांत मुंबईतील रेल्वे रुळांवर 26 हजार 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2015 ते मे 2025 दरम्यान मुंबईत रेल्वे रुळांवर एकूण 26 हजार 547 मृत्यू झाले. हे मृत्यू मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय नेटवर्कवर झाले. यामध्ये सर्वाधिक 14 हजार 175 मृत्यू हे लोक रुळ ओलांडताना झालेत.
मुंबईतील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ, चालत्या लोकल ट्रेनमधून 10 प्रवासी पडल्याची घटना नुकतीच घडली होती. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले होते. हे सर्व प्रवासी ट्रेनच्या दारात लटकून उभे होते.