46.8 अंश तापमानात 28,952 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा:शिष्यवृत्तीसाठी शाळा भरली, 1 हजार 647 विद्यार्थी गैरहजर
![]()
अमरावती शहरात रविवार, २६ एप्रिल रोजी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या कडक उन्हातही चौथी आणि सातवीच्या २८,९५२ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. गेल्या आठवडाभरापासून अमरावतीमध्ये तापमानाचे नवे विक्रम नोंदवले जात आहेत. या परीक्षेसाठी चौथीचे १७,५६१ आणि सातवीचे ११,३९१ असे एकूण २८,९५२ विद्यार्थी प्रविष्ट होणार होते. वाढत्या तापमानामुळे १,६४७ विद्यार्थी अनुपस्थित राहिले. यात चौथीचे ९०७ आणि सातवीचे ७४० विद्यार्थी होते. सकाळी ११ ते १२.३० आणि दुपारी २ ते ३.३० या वेळेत दोन पेपर घेण्यात आले. विद्यार्थ्यांना पहिल्या पेपरच्या अर्धा तास आधी केंद्रावर उपस्थित राहण्यास सांगितले होते, त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना सकाळपासून सायंकाळपर्यंत उन्हाचा सामना करावा लागला. जिल्ह्याभरात चौथीसाठी १४६ आणि सातवीसाठी १०४ असे एकूण २५० परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली होती. शिक्षण विभागाने उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यक व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, बहुतेक वर्गखोल्यांमध्ये पंखे आणि व्हरांड्यात पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. मात्र, वाढत्या तापमानामुळे कोणत्याही वर्गखोलीत कुलर किंवा थंड हवेसाठी इतर उपकरणे दिसली नाहीत. दोन्ही पेपरमध्ये दीड तासाचे अंतर होते. या वेळेत विद्यार्थ्यांना जेवण उरकून घ्यायचे असल्याने अनेक पालकांनी सोबत जेवण आणले होते. मात्र, पालकांना थांबण्यासाठी केंद्रांवर पुरेशी सावलीची जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे काही पालकांनी घरी जाऊन परत येणे पसंत केले, तर दूरवरून आलेल्या पालकांनी जवळपास सोयीची जागा शोधून तिथेच थांबणे पसंत केले. तालुकानिहाय आकडेवारीनुसार, विद्यार्थ्यांची सर्वाधिक अनुपस्थिती अमरावती महापालिका क्षेत्रात आणि ग्रामीण भागात नोंदवली गेली. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, चौथीच्या परीक्षेला महापालिका क्षेत्रातील २३० आणि ग्रामीण भागातील १०६ विद्यार्थी गैरहजर होते. सातवीच्या परीक्षेला पालिका क्षेत्रातील २२४ आणि ग्रामीण भागातील ७० विद्यार्थ्यांनी अनुपस्थिती दर्शविली. इतर तालुक्यांमध्ये अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या सरासरी ५० च्या आसपास होती, त्या तुलनेत अमरावतीतील आकडेवारी सर्वाधिक होती.
