धीरेंद्र शास्त्रींच्या विधानानंतर 'सह्याद्री' आक्रमक:'आम्हाला शिवराय शिकवू नका', अंबादास दानवे आणि अमोल कोल्हेंचा घणाघात
![]()
नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या काही विधानांमुळे नवा वाद निर्माण झाला असून राजकीय व सामाजिक वर्तुळातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शास्त्री यांनी हिंदू समुदायाला आवाहन करताना “चार मुले जन्माला घाला आणि त्यातील एक अपत्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या,” असे विधान केले. या विधानावरून विरोधकांनी टीका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केले आहे. अंबादास दानवे म्हणाले, महाराष्ट्रात येऊन येथील लोकांना छत्रपती शिवाजी महाराज ‘शिकवण्याचा’ हा धंदा नवा नाही. दुर्दैवाने त्यात कधीकाळी आमच्यातच राहिलेले काही महाभागही सामील झाले आहेत. विषय इतकाच आहे की, ही सगळी टोळी आता भाजप नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसते. महाराष्ट्रात लेकरू आई-बापाला ओळखण्यापूर्वीच शिवाजी महाराजांना ओळखू लागते, हे या वाचाळांना बहुदा ठाऊक नसावे! तसेच, वणी-दिंडोरीच्या लढाईत महाराज स्वतः बख्तर चढवून रणांगणात उतरले होते आणि त्यांनी सहा तास अविश्रांत झुंज दिली होती, याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. कोणाला हवे असतील, तर ते आम्ही जरूर पाठवून देऊ, असे दानवे यांनी म्हटले आहे. अमोल कोल्हे काय म्हणाले? तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावर भाष्य करत आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, मुघली आक्रमणासमोर उत्तर भारताने पळी पंचपात्र दडवून मान झुकवलेली असताना, सह्याद्रीच्या कातळावर तलवारीच्या पात्याने इतिहास कोरणाऱ्या महाराष्ट्राला उत्तरेतून येऊन चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे कोणी छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न करू नये. शिवविचारांवर पिंड पोसलेल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ आराध्य दैवत नाहीत तर आमची अस्मिता, स्वाभिमान आणि ओळख आहेत… काल, आज आणि उद्याही, असे स्पष्ट केले आहे. काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री? शिवाजी महाराज युद्ध करून थकले तेव्हा एक दिवस ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले आणि आपला मुकूट उतरवून रामदास स्वामींना दिला. आता हे राज्य तुम्ही सांभाळा अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी हसून मी राज्य चालवतो, तुम्ही अंमलबजावणी करा, असे म्हटल्याचा दावा शास्त्री यांनी केला होता.
