![]()
खगोलप्रेमी आणि जिज्ञासूंसाठी आजचा रविवार (२१ जून) हा दिवस महत्त्वाचा आहे. उत्तर गोलार्धात रविवारी वर्षातील सर्वात मोठा दिवस अनुभवता येणार असून, दिनमान १३ तास १३ मिनिटांचे असेल. मराठी विज्ञान परिषदेच्या स्थानिक शाखेचे पदाधिकारी विजय गिरुळकर आणि प्रा. प्रवीण गुल्हाने यांनी नागरिकांना या खगोलीय घटनेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे. भारतात, म्हणजेच उत्तर गोलार्धात, २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. या खगोलीय घटनेला ‘समर सॉलस्टाईस’ किंवा ‘उन्हाळी संक्रांती’ असेही म्हटले जाते. या दिवशी सूर्य पृथ्वीच्या कर्कवृत्तावर थेट वर असतो, ज्यामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होते. ‘समर सॉलस्टाईस’ ही एक नैसर्गिक खगोलीय घटना आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा वेग आणि कक्षेतील सूर्यासमोरचे स्थान यामुळे दररोज दिवस आणि रात्रीचा कालावधी बदलतो. २१ जून रोजी पृथ्वी सूर्यासमोर कक्षेत अशा विशिष्ट ठिकाणी येते, ज्यामुळे या दिवशी पृथ्वीवर सर्वाधिक सूर्यप्रकाश पडतो. विजय गिरुळकर आणि प्रा. प्रवीण गुल्हाने यांच्या मते, जगातील अनेक देशांमध्ये २१ जून रोजी दिवस १२ तासांपेक्षाही मोठा असतो. मराठी विज्ञान परिषदेने सर्व खगोलप्रेमी, विद्यार्थी आणि जिज्ञासूंना या १३ तास १३ मिनिटांच्या दिनमानाचे प्रत्यक्ष कालमापन करून या खगोलीय चमत्काराचा अनुभव घेण्याचे आवाहन केले आहे. या घटनेविषयी अधिक माहितीसाठी नागरिक ९५६३७४८४१२ किंवा ९४२२८६८८१२ या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. खगोलशास्त्रीय रचनेनुसार, पृथ्वी आपल्या अक्षावर २३.५ अंशांनी कललेली आहे. २१ जून रोजी पृथ्वीचा उत्तर ध्रुव सूर्याकडे सर्वाधिक झुकलेला असतो. यामुळे सूर्य या दिवशी उत्तर गोलार्धात ‘कर्कवृत्तावर’ अगदी डोक्यावर येतो. या स्थितीला ‘उन्हाळा संपात दिन’ असेही संबोधले जाते. याच दिवशी वर्षातील सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र अनुभवता येते. या दिवशी सूर्याचे उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. या बदलत्या खगोलीय स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी, दिवसा कोणत्याही वस्तूच्या सावलीचे निरीक्षण केल्यास उत्तरायण व दक्षिणायन यांमधील सूक्ष्म बदल सहज लक्षात येऊ शकतात, असे अभ्यासकांनी सांगितले आहे.
21 जून वर्षातील सर्वात मोठा दिवस:दिनमान 13 तास 13 मिनिटे, उत्तर गोलार्धात 'समर सॉलस्टाईस'चा अनुभव घ्या
