दिव्य मराठी- 6 महिन्यांपूर्वी उबाठातून भाजपमध्ये, तरीही अध्यक्ष कसे केले?:अध्यक्ष गलांडे- पक्षात नवा-जुना असे काही नसते, अनुभवामुळे पद दिले
![]()
जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजपने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती बिनविरोध निवडून आणले आहेत. भाजपने 6 महिन्यांपूर्वी उबाठातून आलेल्या अविनाश गलांडे यांना अध्यक्ष केले. शिवसेनेने उबाठा अन् अपक्षांची मोट बांधून अध्यक्ष बसवण्याची तयारी केली होती. मात्र, भाजपने एका रात्रीत ‘गेम’ फिरवत बहुमताची ‘मॅजिक फिगर’ त्यांच्या बाजूने केली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी हे सांगितले. त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. जलजीवन मिशनच्या योजनेमध्ये अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकांमुळे योजना पूर्ण होऊनही पाण्याची समस्या कायम असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या शाळा डबघाईला आल्या आहेत. शिक्षण व्यवस्थेत बदल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शिवसेनेसोबत गेलेल्या उबाठाचे दोन सदस्य कसे फोडले? – दोन नव्हे. सर्व 9 सदस्य गैरहजर होते. फोडाफोडीचे राजकारण मित्रपक्षाने सुरू केले होते. 6 महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये आल्यानंतर भाजपने थेट अध्यक्षपदी कसे बसवले?
भाजपमध्ये आलेला प्रत्येक जण भाजपचाच असतो. नवा-जुना असे नसते. मला जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा अनुभव आहे. त्यामुळे भाजपने स्थानिक वरिष्ठ नेत्यांनी मला संधी दिली. माजी आमदार वाणी यांचा वारसदार म्हणून आपले नाव चर्चेत होते. मग आपणाला डावलून बोरनारे यांना संधी कशी काय दिली? हे खरे आहे. मात्र, आमदार वाणी यांनी बोरनारे यांना आमदारकी देण्याबाबत सांगितले. मला जिल्हा परिषदमध्ये काम पाहण्यास सांगितले. त्यांचा शब्द मी मान्य केला. शिवसेना फुटीनंतर आपण उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलात. मग ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश का केला? मी लहानपणापासून आरएसएसचे काम करायचो. राजकारणाशिवाय मला आता दुसरे काही करणेही शक्य नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातील विकासकामे करण्यासाठी मी सत्तेत असलेल्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत. शिक्षकांना मुख्यालयी राहण्याबाबत सक्ती करणार का?
खासगी शाळांमुळे अनेक शाळांत विद्यार्थी नाहीत. अनेक ठिकाणी शिक्षक नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. शिक्षक घरभाडे भत्ता घेतात. त्यामुळे त्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे. विद्यार्थी वाढवण्यासाठी आम्ही करसवलत देण्याबाबतही विचार करत आहोत. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढीसाठी आपण काय करणार? जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणार आहे. कृषी विद्यापीठासह इतर ठिकाणी अतिक्रमण झालेल्या जागा मोकळ्या करणार आहोत. दिवाळीपूर्वी नवीन इमारतीत सर्व विभाग एकत्र करण्याचा माझा मानस आहे. शब्दांकन – गणेश गाडेकर
