प्रेमसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेची २.१० लाखांची खंडणी

नांदेड (प्रतिनिधी) – प्रेमसंबंधातील फोटो सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देत एका महिलेकडून तब्बल २ लाख १० हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नांदेड येथील फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून सचिन गौतम कोकरे (रा. छत्रपती चौक, नांदेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीच्या मैत्रिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातील छायाचित्रे आपल्या ताब्यात घेऊन ती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच हा प्रकार कुणालाही सांगू नये, अन्यथा बदनामी होईल असे सांगून संबंधित महिलेला मानसिक त्रास दिला. या धमक्यांच्या आधारे आरोपीने २८ फेब्रुवारी २०२२ ते ११ जून २०२६ या कालावधीत फिर्यादीकडून वेळोवेळी एकूण २ लाख १० हजार रुपये उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०८(२), ३०८(३), २९६ आणि ३५१(३) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक पुरी करीत आहेत. या घटनेमुळे सोशल मीडियाचा गैरवापर करून खंडणी उकळण्याच्या वाढत्या प्रकारांबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *