विटभट्टी कामगाराचा मुलगा बनला ‘कॅग’ मध्ये लेखाधिकारी:पहिल्याच प्रयत्नात 22 व्या वर्षी मिळविली नोकरी
![]()
मोर्शी तालुक्यातील सावरखेड या छोट्याशा गावातील रहिवासी आणि विटभट्टी कामगारांचे चिरंजीव भावेश वर्षा अनिल वानखडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या संस्थेत यश संपादन केले आहे. स्पर्धा परीक्षांमधून त्यांनी कॅग (कन्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया) या संस्थेत लेखाधिकारी (अकाउंटंट) ही नोकरी मिळविली आहे. विशेष असे की भावेश सध्या केवळ २२ वर्षांचे असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण करून यश संपादन केले आहे. भावेश यांनी विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीद्वारा संचालित अमरावतीच्या समाजकार्य महाविद्यालयातून २०२४ मध्ये बी.एस.डब्ल्यू. ही पदवी पूर्ण केली. समाजकार्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू ठेवली होती. त्यासाठी त्यांनी कठोर परिश्रम घेतले. या परिश्रमांच्या जोरावरच त्यांनी हे यश संपादन केले आहे. भावेश यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मात्र तरीही त्यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. त्यांचे वडील वीटभट्टीवर मजुरीचे काम करतात. आई सूतगिरणीत कामगार म्हणून कार्यरत आहे. अशा परिस्थितीतही भावेश यांनी आपले स्वप्न सोडले नाही. चिकाटी, मेहनत व जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले. भावेशच्या या यशाबद्दल विदर्भ युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे, उपाध्यक्ष ॲड. उदय देशमुख, कोषाध्यक्ष प्रा. डॉ. हेमंत देशमुख, सचिव युवराजसिंग चौधरी, कार्यकारिणी सदस्य नितीन हिवसे, डॉ. पुनम चौधरी, पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड, प्रा. गजानन काळे तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार दासरवाड आदी मान्यवरांनी त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही भावेशच्या यशाचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ^मी सुरुवातीपासूनच रोजगाराचा मार्ग शोधत होतो. समाजकार्य महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर या शोधाला अधिक बळकटी मिळाली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्राध्यापकांनीही मला सतत प्रोत्साहन दिले. त्यामुळे हे यश प्राप्त करू शकलो. भविष्यात याहून मोठे यश प्राप्त करण्यासाठीची माझी धडपड सुरूच आहे. जिद्द कायम ठेवल्यास यश हमखास मिळते. हे यानिमित्ताने मला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सांगायचे आहे. – भावेश वानखडे, सावरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती. जिद्द कायम ठेवा, तुम्हाला यश हमखास मिळणार
