सप्तशृंगी गडावर 22 किलो चांदीचा अपहार!:जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे निर्देश, मंदिर ट्रस्टच्या कारभारावरच संशय

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-23t125737443_1776929232.jpg




महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात 22 किलो चांदीची तफावत आढळल्याने मोठी खळबळ उडाली असून, या चांदी अपहार प्रकरणाची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत आता सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठीच्या जुन्या नोंदींमध्ये 406 किलो चांदीचा उल्लेख असताना, प्रत्यक्षात करण्यात आलेल्या मोजणीत मात्र केवळ 383 किलो 703 ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे आढळले असून, यातून तब्बल 22 किलो 490 ग्रॅम चांदीचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. 25 मार्च 2026 रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालयाने हे प्रकरण नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सोपवले असून, अपर आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या लेखी आदेशानंतर निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनीही कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि ट्रस्टच्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा सखोल अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी चौकशी समितीसमोर दिलेल्या माहितीनुसार, चांदी काढताना नियमानुसार पंचनामा करणे, अधिकृत वजन करणे किंवा सीलबंद करणे यांपैकी कोणतीही प्रक्रिया पार पडली नाही. व्यवस्थापकांच्या या धक्कादायक खुलाशामुळे हा प्रकार केवळ तांत्रिक घोळ नसून, एक जाणीवपूर्वक केलेला नियोजित अपहार असल्याचा संशय आता अधिक बळावला आहे. या प्रकरणाविरोधात स्थानिक सामाजिक कार्यकर्ते छगन जाधव, माजी सरपंच बेबीबाई जाधव यांनी विधीज्ञ सुरेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जानेवारी 2026 पासून आंदोलन छेडले होते. वारंवार पाठपुरावा करूनही सुरुवातीला प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे तक्रार केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली असून चौकशीला वेग आला आहे. या गंभीर प्रकरणी ट्रस्टचे अध्यक्ष, विश्वस्त आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच अपहार केलेल्या चांदीची रक्कम व्याजासह वसूल करावी, अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगी गडावरील या भ्रष्टाचारामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट असून, सर्वांचे लक्ष आता अंतिम चौकशी अहवालाकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed